
यवत येथील शाळेचे रूप पालटले
यवत, ता. ६ ः यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने विद्यालयाच्या इमारतीचा कायापालट झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून रंगरंगोटीची वाट पाहात असलेल्या इमारतीचे बाहेरील रंगकाम माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकार व हातभारामुळे पूर्ण झाले आहे.
यवत येथील विद्यालयासाठी मागील अनेक वर्षांपासून इमारतीची अडचण होती. ग्रामपंचायतच्या मालकीची मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी वापरात असलेली इमारत काही दिवसांपूर्वी विद्यालयास देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला. वीस वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत सुस्थितीत असली तरी रंगकाम नसल्याने ही इमारत जीर्ण वाटत होती. सरपंच समीर दोरगे हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी इतर माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने रंगकाम पूर्ण होऊ शकते, असे सुचविले. मुख्याध्यापक दादा मासाळ यांनी विविध बॅचच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत सन १९९७- १९९८मध्ये दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅचचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यानंतर सन २००२- २००३, सन २००४- २००५, सन २००३-२००४, सन १९९२- १९९३ अशा विविध वर्षी दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅचचा स्नेहमेळावा आयोजित केला. यावेळी शाळेच्या रंगकामासाठी जमेल तसा निधी जमविण्याचा प्रयत्न केला. आता शाळेची इमारत बाहेरील बाजूने पूर्ण रंगवून झाली. माजी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांनी या शाळेचे गतवैभव पूर्वस्थितीत आणण्याचा चंग बांधला आहे. त्याचा परिणाम शाळेत प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
69297
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22f03385 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..