रस्त्यांच्या नद्या, शेतांची तळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांच्या नद्या, शेतांची तळी
रस्त्यांच्या नद्या, शेतांची तळी

रस्त्यांच्या नद्या, शेतांची तळी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप पिकांचा घास सोमवारी (ता. १७) सायंकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे हिरावला गेला. या पावसामुळे अंजीर, सीताफळ यासारख्या फळबागांसह खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, भुईमूग यासारख्या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. याशिवाय मिरची, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घेवडा यासारख्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचीही मोठी हानी झाली. ठिकठिकाणी घरांची पडझड झाली असून, दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे काही ठिकाणी शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे स्थायी आदेश आहेत. त्यामुळे तहसीलदारांमार्फत नुकसानीची पाहणी केली जात आहे. शिवाय झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या अतिवृष्टीमुळे हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील घरे, गोठे, उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे एका शेतकऱ्याच्या शेळ्या चिखलात गाडल्या गेल्या. येथील सुमारे २५ घरांची पडझड झाली.

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे विक्रमी १२८; तर केडगाव येथे १०० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील उजनी व वीर धरण पूर्ण भरल्याने भीमा नदीत ६१ हजार ६०० क्यूसेकने; तर नीरा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडल्याने आणि कऱ्हा नदीला पुर आल्याने पुणे व सोलापूरला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील दळणवळण सुमारे १४ तास ठप्प झाले होते. पुणे-नाशिक महामार्गाला चाकण (ता. खेड) येथे नदीचे स्वरूप आले होते.त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक १६ तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.

कोठे काय घडले
- कऱ्हा नदीवरील भापकरमळा (ता. बारामती) येथील कोल्हापूर बंधारा वाहून गेला.
- अंजनगावाजवळील (ता. बारामती) कऱ्हा नदीकाठच्या सुमारे २३ कुटुंबांचे स्थलांतर.
- पेरणे (ता. हवेली) येथे वाहतूक ठप्प.
- नाझरे धरणातून कऱ्हा नदीत पाणी सोडल्याने बारामती शहरातील २०० कुटुंबांचे स्थलांतर.
- इंदापुरात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश.