शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दिवाळीनंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दिवाळीनंतर
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दिवाळीनंतर

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दिवाळीनंतर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी राज्य सरकारला तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा मुहूर्त सापडला आहे. त्यानुसार दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या ३१ आॅक्टोबरपासून प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. राज्य सरकारने या बदल्यांसाठीचे सविस्तर वेळापत्रक जिल्हा परिषदेला निश्‍चित केले आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सुमारे १ हजार शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यातच राज्य सरकारने गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करून नवे बदली धोरण जाहीर केले होते. या नव्या धोरणानुसार आॅनलाइन बदल्या करण्यासाठी खास मोबाईल अॅप विकसित केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अवघड क्षेत्रातील शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना बदल्यांच्या माध्यमातून सुगम भागातील शाळांवर येण्यास मोठी आडकाठी निर्माण झाली होती. ती आता दूर झाली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू व्हावी, यासाठी मागील वर्षभरापासून विविध शिक्षक संघटना प्रयत्न करत होत्या.

मागील तीन वर्षाचा अपवाद वगळता शिक्षकांच्या दरवर्षी आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या होत असतात. यानुसार जिल्ह्यातील एकूण शिक्षक संख्येच्या दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्या केल्या जातात. पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या सुमारे अकरा हजारांच्या आसपास आहे. यापैकी सध्या १९४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी (ता. २०) बदल्यांची प्रक्रिया २१ आॅक्टोबरपासून सुरु करण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यात शुक्रवारी दुरुस्ती केली असून, आता ही प्रक्रिया २१ऐवजी येत्या ३१ आॅक्टोबरपासून सुरु करण्याचा नवीन आदेश शुक्रवारी (ता. २१) रात्री उशिरा दिला आहे.

शिक्षकांच्या बदल्यांचा कालबद्ध कार्यक्रम
- अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करणे- ३१ आॅक्टोबर
- बदलीसाठी पात्र शिक्षकांची यादी जाहीर करणे- ३१ आॅक्टोबर व १ नोव्हेंबर
- रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे- ४ नोव्हेंबर
- विशेष संवर्ग भाग १ आणि २ चे फॉर्म भरणे- ५ ते ७ नोव्हेंबर.
- विशेष संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे- ९ नोव्हेंबर
- विशेष संवर्गातील शिक्षकांच्या प्रत्यक्ष बदल्या करणे- २७ ते २९ नोव्हेंबर