शालेय पोषण आहाराचे ७० टक्के अनुदान वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय पोषण आहाराचे ७० टक्के  अनुदान वाटप
शालेय पोषण आहाराचे ७० टक्के अनुदान वाटप

शालेय पोषण आहाराचे ७० टक्के अनुदान वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः शालेय पोषण आहार योजनेचे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचे बिल तयार झालेले नाही. परिणामी, ३० सप्टेंबरला पटसंख्येनुसार अंदाजित ७० टक्के अनुदान शासनाने वाटप केले. मुख्याध्यापकांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम दिवाळीनंतर वळती करण्यात आली आहे. तर यातील ३० टक्के अनुदान आणि उर्वरित महिन्याचे अनुदान लवकरच वाटप केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

शहरात मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोषण आहारात विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ वाटप केले होते. तर त्या कालावधीतील वाटपाच्या सर्व नोंदी ऑफलाइन घेण्यात आल्या. मात्र, मार्च २०२२ पासून पोषण आहार शिजवून वाटप करण्यास सुरवात झाली आहे. त्या कालावधीत इंधन, भाजीपाला, खाद्य तेल, पूरक आहार अनुदान रक्कम अदा केली नव्हती. या अनुदानाची रक्कम मिळावी, यासाठी शाळा प्रशासनाकडून ओरड सुरू होती. अशात शासनाने शाळांचे ७० टक्के अनुदान देण्याचे निश्चित केले होते. दरम्यान, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील ७० टक्के रक्कम नुकतीच मुख्याध्यापकांच्या खात्यात वळती केली आहे. ही रक्कम ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार अंदाजित वळती केली आहे. आता शिल्लक राहिलेली ३० टक्के रक्कम येत्या काळात अदा केली जाणार आहे. तर त्यानंतरच्या महिन्यातील पोषण आहार अनुदानाच्या रकमेचे समायोजन करून मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वळती केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नोंदी रखडलेल्याच
मार्च २०२२ पासून विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जात आहे. त्यामुळे इंधनापासून ते तांदूळापर्यंतच्या ऑनलाइन नोंदी घेणे गरजेचे होते. मात्र, बहुतांश शाळेच्या नोंदी विहित कालावधीत होऊ शकल्या नाही. परिणामी, शासनाने बॅक डेटमध्ये नोंदी घेण्यास मुदत दिली. ही मुदत तीनवेळा दिली. तरीही अनेक मुख्याध्यापकांनी नोंदी घेतलेल्या नाहीत, असे म्हणणे आहे.

मुख्याध्यापकांचे फावते
शासनाने ३० सप्टेंबर रोजीच्या पटसंख्येप्रमाणे ७० टक्के अनुदान रक्कम अदा केली. यात बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीसुद्धा झाल्याची शंका आहे. अशा शाळेच्या मुख्याध्यापकांचे चांगलेच फावते झाले आहे. आता उर्वरित रक्कमसुद्धा त्याच पद्धतीने वितरित केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.