वायसीएममधील कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायसीएममधील कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
वायसीएममधील कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

वायसीएममधील कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

sakal_logo
By

पिंपरी, ता.१२ ः महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) गेली १८ वर्षे राबणारे वर्ग ३ आणि वर्ग चारमधील मानधनावरील ३०४ कर्मचारी कायम सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. २ वर्ष काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येत आहे. मग आम्ही वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी नाहीत का? आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्‍न या कर्मचाऱ्‍यांनी केला आहे. त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. महापालिकेकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

गेल्या १५ ते २० वर्षांपासून हे कर्मचारी स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ब्लड बॅंक तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, फार्मासिस्ट, स्त्री-पुरुष कक्ष मदतनीस (वॉर्ड आया आणि वॉर्ड बॉय), नेत्र चिकित्सा सहाय्यक, ई.सी.जी.तंत्रज्ञ, वाहन चालक, रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मासिक वेतन महिन्याच्या १० ते १५ तारखेपर्यंत देण्यात येते, तसेच राज्य कर्मचारी विमा योजना, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी अशा कोणत्याही सुविधा नाहीत. शिफ्टच्या रोटेशननुसार सुटी आणि वर्षातून केवळ सहा किरकोळ रजा मिळतात. सेवेत कायम करण्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी न्यायालयात दावा दाखल केला आहे. परंतु, प्रशासनाने या पदासाठी १२ वर्षांपूर्वी परीक्षा घेतली. या कर्मचाऱ्यांना महापालिकेने सर्वसाधारण सभेत २०२० मध्ये प्रस्ताव केला आहे. तरीही दोन वर्षापासून निव्वळ बोळवण केली जात आहे. म्हणून सर्वजण १८ नोव्हेंबरपासून ‘अन्नत्याग’ आंदोलन करणार आहोत.

कर्मचारी म्हणतात...
वॉर्ड आया अनिता पवार व कविता गायकवाड ः गेली १८ वर्षे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आम्ही मानधनावरच राबत आहोत.
सुजाता आढाव ः अनेक वेळा आंदोलन करूनही न्याय मिळेना.
वॉर्ड बॉय मोहन जाधव ः कोरोनामध्ये आरोग्य सेवा देऊनही आमची दखल कोणी घेत नाहीये.
रवींद्र सुपे ः कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. २ हजार रुपयांचा गणवेश विकत घ्यावा लागतो.
डाटा ऑपरेटर सुनयना साळुंखे ः इतर कर्मचारी कसे काय कायम होतात. ते गूढ कळेना.
ईसीजी टेक्निशियन झीनत इनामदार ः १८ वर्षापासून कोणत्याच सुविधा नाही. आम्हाला न्याय द्या.
एक्सरे टेक्निशियन अमीन शेख ः बीव्हीजीने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देण्यात आल्या.
नर्स शुभांगी माने व शीतल मते ः १६ वर्षापासून कायम सेवेत होईल, अशा अपेक्षेने काम करत आहे.
लॅब टेक्निशियन स्नेहलता मिसाळ ः मासिक वेतन वेळेवर होत नाही. आम्हाला कायम सेवेत करावे.
सांख्यिकी अर्चना ननावरे ः ‘रेकॉर्ड विभागात काम करतेय. एकच पद मान्य आहे. प्रामाणिकपणे काम करूनही न्याय मिळत नाही.
राजेश कदम ः सर्जरी विभाग सलग कित्येक वर्ष काम करत आहे. तरी प्रशासन आमच्यावर दया करत नाही.
फार्मासिस्‍ट स्नेहलता माळी ः इन-आउट किंवा थम्ब व्यवस्थित न झाल्यास गैरहजेरी लावतात.
अमित जोगदंड ः सतत लिपीकाची बदली होत असल्याने वेळेवर पगार होत नाही.

या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले,‘‘हा प्रश्‍न न्याय प्रलंबित बाब आहे. सध्या कोविडमध्ये काम केलेल्या लोकांना संधी मिळाली आहे.’’

आकडे बोलतात
-पदनाम - कर्मचारी संख्या
-स्री-पुरुष कक्ष मदतनीस - ५२
-स्टाफ नर्स - १८०
-प्रयोगशाळा तंत्रज्ञ -२०
-डाटा एंट्री ऑपरेटर -१३
-क्ष-किरण तंत्रज्ञ - १६
-ब्लड बॅंक तंत्रज्ञ - १०
-नेत्र चिकित्सा सहाय्यक- १
-फार्मासिस्ट - १
-ई.सी.जी.तंत्रज्ञ -१

-वाहन चालक -१
-रेडिऑलॉजिस्ट - १
-एकूण - ३०४