समस्यांपेक्षा मार्ग शोधायला शिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समस्यांपेक्षा मार्ग शोधायला शिका
समस्यांपेक्षा मार्ग शोधायला शिका

समस्यांपेक्षा मार्ग शोधायला शिका

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘‘विद्यार्थ्यांनी काळानुसार बदल स्वीकारत मार्गक्रमण केले पाहिजे. समस्यांपेक्षा मार्ग शोधायला शिकले पाहिजे. युवकांनी विकसित तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सकारात्मकपणे वाटचाल केली पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी प्रथमतः स्वतःची ओळख करून घ्यायला पाहिजे. सकारात्मक मानसिकता ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर प्रगतीचा आलेख उंचावत जातो,’’ असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सत्यजित पाटील यांनी व्यक्त केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रम व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी चाकण (ता. खेड) व सेवासहयोग फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास व उद्योजकता’ या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पाटील बोलत होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था माणिकडोह (ता. जुन्नर) व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोनवडी-घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
प्रा. डॉ. पाटील म्हणाले, ‘‘नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात केला जात आहे. शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे कुशल व कौशल्य असलेल्या युवकांची आवश्‍यकता आहे. आपण जे ज्ञान घेवू ते सर्वोत्तम घेतले पाहिजे. ध्येय निश्‍चित करताना आपली आवड, निवड व क्षमतासुद्धा ओळखल्या पाहिजेत. संवादकौशल्ये हा व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्याच्या विपणन क्षेत्रात त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. त्यामुळे उत्तम संवाद कौशल्ये विकसित केली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर सक्षम व सकारात्मक पद्धतीने करायला शिकले पाहिजे. केवळ परिस्थितीला दोष न देता यश खेचून आणण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. यश मिळविणे कठीण असले; तरी अशक्य नसते. त्यामुळे युवकांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करताना भीती बाळगू नये.’’
यावेळी त्यांनी नारायण मूर्ती, आनंद महिंद्रा, अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी जीवनाची उदाहरणे दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर सादर केली. यावेळी संस्थेचे प्राचार्य अशोक साबळे, प्राचार्य डी. एस. जगताप, नानासाहेब कुलकर्णी, दीपाली हांडे-कुलकर्णी, हितेश परदेशी, प्रमोद वायाळ, अविनाश मेहेर, प्रमोद वायाळ, स्वाती बहिरट, गटनिदेशक सुधीर खेडकर, प्रभाकर भांगरे, रूपाली घोडेकर, स्वाती जव्हेरी, प्रकाश पत्की, नितीन जाधव आदी उपस्थित होते. ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळांचे संयोजन केले.

सृजनशीलता, विनम्रता, संवेदनशीलता, प्रभावी संवाद शैली, आश्‍वासक देहबोली, वेळेचे व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकीची जाणीव, आर्थिक शिस्त व तंत्रस्नेही वृत्ती बाळगल्यास आपण समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतो.
- डॉ. प्रा. सत्यजित पाटील,
पेमराज सारडा महाविद्यालय

०४५१५