महापालिका शाळांची वाढली पटसंख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळांची वाढली पटसंख्या
महापालिका शाळांची वाढली पटसंख्या

महापालिका शाळांची वाढली पटसंख्या

sakal_logo
By

पिंपरी, ता.१५ ः गेल्या दोन वर्षात विशेषतः कोरोना काळात खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांकडे धाव घेतल्याचे चित्र आहे. एकेका शाळांमध्‍ये १०० विद्यार्थ्यांची भर पडली आहे. कामगार बहुल भागात पटसंख्या वाढल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसत आहे. कोरोना काळात कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे बहुतांश कामगार वर्गाने मुलांच्या शाळेत बदल केल्याचे कारण समोर येत आहे.

कोरोना काळात पर्याय दिल्याचा परिणाम
कोरोना येण्यापूर्वी महापालिका शाळांची पटसंख्या कमी झाली होती. काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त झाले. मात्र, आता याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २०१८ च्या तुलनेत यावर्षी १० टक्क्यांनी प्रवेश वाढले आहे. त्यातही मुलांच्या तुलनेने मुलींच्या प्रवेश संख्येत वाढ झाली आहे. कोरोना काळात महापालिकेने विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी अभ्यास साहित्य, पाठ्यपुस्तके दिले. ऑनलाइन शिक्षण मिळत नव्हते त्यांच्यासाठीही पर्याय उपलब्ध करून दिले. खासगी शाळांना या काळात जमले नाही ते महापालिकेने दाखवले. याचा परिणाम म्हणजे सतत घसरत निघालेली पटसंख्या वाढत गेली. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३२.५ टक्क्यांवरून २४.४ टक्क्यांपर्यंत आले आहे.

पटसंख्या वाढल्याचा दावा
दापोडी, चिखली, काळेवाडी, जाधववाडी, मोशी, तळवडे, बोपखेल, निगडी अशा भागात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहे. त्या भागातील शाळांमधील पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. ३० पटसंख्येस १ शिक्षक असे निकषांनुसार शाळामध्ये शिक्षकांची मोठी वानवा आहे. ज्या ठिकाणी पट कमी आहे, अशा ठिकाणी शिक्षकांची जंत्री पाहायला मिळते. शिक्षण विभागाने जादा पटसंख्येच्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. पिंपळे सौदागर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका सुरेखा जोशी यांनी शाळेतील वातावरण, मोफत मिळणारे साहित्य, शिक्षणाचा दर्जा यामुळे पटसंख्या वाढल्याचा दावा केला आहे.
..............
ही आहेत कारणे
- मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर
- कोरोनामुळे अनेक क्षेत्रांतील अर्थकारणावर परिणाम
- कोरोनाकाळात अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात घट
- खासगी शाळांची वाढलेली भरमसाट शुल्क
- छोट्या खासगी शाळांचे अर्थकारणही ढासळल्याने अनेक शाळा झाल्या बंद
- कोरोना काळात सरकारी शाळांची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत
................
आकडे बोलतात (काही निवडक शाळा)
शाळा /पटसंख्या / उपलब्ध शिक्षक / रिक्त जागा
-काळेवाडी ५६/१ -३०५ / ३ /५
-जाधववाडी मुले -८२०/१४ /६
- मोशी मुले -१०२२/२२/४
- कन्या मोशी -१०८४/२३/६
- निगडी २/२- ६६९/१३/४
- निगडी २/१ - ४६८/९/५
- तळवडे- ५६९ /९/२
- पिंपळे सौदागर - ४७५ /९/ ४
- खिंवसरा शाळा-२११/५/२
.....................
पालक म्हणतात
‘‘माझा मुलगा इयत्ता चौथीत आहे. शिकविण्याची पद्धत चांगली आहे. शिक्षकांकडून मुलाच्या प्रगतीची माहिती दिली जाते. शाळेतील वातावरण छान आहे.’’
- स्वाती भोसले, पालक पिंपळे सौदागर

‘‘मुलगा पहिलीत शिकत आहे. शिक्षक आणि शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. खासगीच्या तुलनेत बरीच सुविधा महापालिका शाळेत आहेत.’’
- शीला शरणागत, पालक, पिंपळे सौदागर