महागड्या पाळीव प्राण्यांचा अवैध प्रजननाचा गोरखधंदा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागड्या पाळीव प्राण्यांचा अवैध प्रजननाचा गोरखधंदा!
महागड्या पाळीव प्राण्यांचा अवैध प्रजननाचा गोरखधंदा!

महागड्या पाळीव प्राण्यांचा अवैध प्रजननाचा गोरखधंदा!

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : शहरासह जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी न करता पेट्स शॉप (पाळीव प्राणी विक्री दुकाने) व अवैध डॉग ब्रीडींग व ब्रीडर्स (श्वान प्रजनन करणारे), तसेच अवैधरीत्या जिवंत पाळीव प्राण्यांचे विक्री सेंटर दिवसाढवळ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी वयस्क मादी श्वानांकडून दर सहा महिन्याला सरासरी ६ ते ७ पिल्ले जन्माला घालून विक्री केली जात आहे. त्या माध्यमातून एका ब्रिडर्स पाठीमागे आठ ते दहा हजार रुपये कमाईचा प्रकार सर्रास सुरु आहे.

पाळीव प्राणी-पक्ष्यांची विक्री करण्यासंदर्भातील परवाना देण्याचा अधिकार हा महापालिकांना नाही. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याप्रमाणे यासंदर्भातील परवाने देण्याचा अधिकार हा केवळ पशुकल्याण विभागाला आहे. मात्र, पुणे व मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये पाळीव प्राणी-पक्ष्यांची विक्री व त्यांचे प्रजनन करणाऱ्या बहुतांश दुकानमालकांनी कायद्याप्रमाणे पशुकल्याण विभागाकडून परवाने घेतलेले नाहीत. तरीही, संबंधित सरकारी प्रशासनांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि आवश्यक कारवाई केली जात नाही. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अधिकृत परवाना घेऊन शहरात सुरु झालेले पेट्स शॉप, तसेच ब्रिडर्स दुकानदारांनाही याचा फटका बसला आहे. विनापरवाना विक्रीमुळे पाळीव प्राण्यांविषयी संवेदनशीलता हरपल्याचे दिसते. तर, दुसरीकडे प्राण्यांच्या आरोग्याशी एक प्रकारे खेळ सुरु आहे. एका महागड्या जातीचे श्वान हे प्रजननानंतर चौपट किमतीने विकले जात आहे. घरबसल्या पैसा कमावण्याचे साधन झाल्याने अनेकजण या व्यवसायाकडे वळले आहेत. काही वर्षापूर्वी एक महागडे विदेशी जातीचे श्वान २५ हजारांपासून अधिक किमतीला मिळत होते. ते आता तीन ते पाच हजार रुपयांपासून मिळू लागले आहे. त्यामुळे, ऐपत नसणारे देखील केवळ प्रतिष्ठेपोटी श्वान सांभाळत आहेत. शिवाय, श्वानांचे संरक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे याची पूर्ण माहिती देखील नसल्याने अनेकदा मुक्या प्राण्यांची हेळसांड होत असल्याचे प्राणी मानसशास्त्र अभ्यासक अभिजित पाटील यांनी सांगितले.

अवैध पद्धतीने प्रजनन करणारे काही व्यावसायिक घरगुती व्यवसाय करत आहेत. अशावेळी श्वान आक्रमक होऊन अनेकांना इजा देखील झालेली आहे. अशी प्रकरणे समोर येत नसल्याने यावर गुन्हे दाखल न होता दंडात्मक कारवाई देखील होत नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, आकुर्डी, चिंचवड, तसेच हिंजवडी अशा अनेक भागात अवैध पेट्स शॉप व ब्रिडर्स व्यावसायिक जोमात आहेत. यासाठी पेट्स असोसिएशन, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

---
अवैध व्यवसायामुळे श्वान विक्रीच्या किमतीमध्ये पडलेला फरक :

श्वानाची जात आधीची किंमत सरासरी सध्याची किमत सरासरी
रुपयामध्ये
सायबेरियन हस्की ३० ते ४० हजार ८ ते १० हजार
गोल्डन रिट्रीव्हर २५ ते ७० हजार १० ते १२ हजार
लॅब्रेडॉर १३ ते ४५ हजार २ ते ५ हजार
डॉबरमन १६ ते २६ हजार २ ते ६ हजार
रॉटव्हिलर १४ ते २५ हजार
८ ते १० हजार
---
कायदा काय सांगतो
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ आणि श्वानप्रजनन व विपणन नियम, २०१७ नुसार जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान नियम, २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांना संस्थाची नोंदणी महाराष्ट्र
प्राणी कल्याण मंडळाकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. अन्यथा ही केंद्रे अवैध समजली जाऊन त्यांच्यावर प्राणी क्लेश कायदा २०१८ पारित अनुसार कडक कारवाई करण्यात येते.
---
या आहेत अटी शर्ती :
नोंदणीसाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे अर्ज करणे
महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तीन महिन्यांसाठी तात्पुरता परवाना
जिल्हा समितीच्या अहवालानंतर पाच वर्षांसाठी परवाना
व्यवसायासाठी कमीत कमी चार ते सहा फुटाची प्रत्येक पाळीव प्राण्यासाठी प्रशस्त जागा
रहिवासी जागा नको, वातानुकूलित जागा आवश्यक
प्राण्यांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ
कासव, पोपट, मांजर, श्वान, चिमणी, गिनीपिग, ससा, हॅमस्टर या जिवंत प्राण्यांच्या विक्रीला बंदी
---
पेट्स शॉप ॲक्ट व ब्रीडर ॲक्टप्रमाणे तसेच प्राणी क्लेश कायदा २०१८ नुसार पाळीव प्राण्यांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सर्व पाहणी केली जाते. त्यानुसार ब्रिडरला परवाना दिला जातो. यासाठी काही मानांकन निश्चित केले आहेत. प्राणीप्रेमींना तक्रार करावयाची असल्यास https://www.punespca.org या वेबसाइटवर संपर्क करावा.
- शीतलकुमार मुखणे, उपायुक्त, पशुपालन, मत्स्यपालन व डेअरी विभाग, पुणे
---
जिल्ह्यात २०० ते २५० पेट्स शॉप अधिकृत आहेत. आम्ही विक्रेत्यांना कोणत्याही फिमेल श्वानाकडून ब्रीडींग करू नका असे सांगत असतो. आमच्या बैठका होत असतात.
-संतोष सातकर, पेट्स असोसिएशन सदस्य, पुणे
---
पॉइंटर :
अवैधरीत्या ब्रीडींगसाठी २८० रुपयांचा दर दिवसाला दंड
नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरुकतेचा अभाव
महापालिका, पशुसंवर्धन विभाग, सामाजिक संस्था व असोसिएशनमध्ये समन्वयाचा अभाव
पशुसंवर्धन विभागाची वेळोवेळी तपासणी
--
आकडे बोलतात -
पिंपरी- चिंचवड शहर :
अवैध ब्रिडर्स : सुमारे ५ हजार
अवैध पेट्स शॉप : सुमारे ३००
---
पुणे जिल्हा
अधिकृत ब्रिडर्स : ३२
पेट्स शॉप्स : २३
परवाना शुल्क : ५ हजार रुपये