अभिनय सम्राट ः दादू इंदुरीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनय सम्राट ः दादू इंदुरीकर
अभिनय सम्राट ः दादू इंदुरीकर

अभिनय सम्राट ः दादू इंदुरीकर

sakal_logo
By

मावळ परगणा गडकोटांचा, बुध्द लेण्यांचा, संत-महंतांच्या विचारांनी भारलेला आणि निसर्ग वनराईने नटलेला. अशा परिसरात लोकलेणी आणि लोक कलाही बहरली. अनेक दिग्गज कलावंत या परिसरात निर्माण झाले. लोक कलेच्या नामावलीत सलग तीस-पस्तीस वर्षांहून अधिक काळ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित लोक कलावंत दादू मारुती इंदुरीकर (सन १९२२ ते २०२२) यांचा जन्म शताब्दी सोहळा सुरू होतो आहे. त्यानिमित्त दादू इंदुरीकरांच्या विषयी जागविलेल्या या आठवणी.
- प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ साहित्यिक

ए रवी दहा जणांसारखे साधेसुधे दिसणारे दादू इंदुरीकर रंगमंचावर गेले की, त्यांच्या अंगी दैवी स्फुरण चढायचे. रंगमंचाचा स्पर्श हा त्यांच्या बाबतीत जणू परीसस्पर्श ठरायचा. या साध्या-सुध्या माणसाला सुवर्णाची झळाळी आणि मोल चढायचे. त्यांचे नुसते साधे पाहणेही अर्थाची भांडारे खुली करत. त्यांनी एखादी सुंदर हालचाल केली तरीही पब्लिक हसता हसता बेजार होई. ते जेव्हा रंगमंचावर वाक्ये फेकत तेव्हा प्रेक्षकांतून हास्याचे फवारे उडत. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे प्रत्येक वाक्य झेलण्यासाठी प्रेक्षक आपल्या जिवाचे कान करत. त्यावेळी ते कान हत्तीच्या कानांप्रमाणे सुपा एवढे झालेले असत.
पट्टीचा पोहणारा ज्या कौशल्याने हात पाण्यावर मारतो त्याच कौशल्याने दादोबा आपली वाक्ये फेकत. सराईत तलवार बहाद्दराचे तलवारीचे वार तसे दादू इंदुरीकरांचे वाक्याचे वार. वाक्य कसे फेकावे, केवढा विराम घेऊन फेकावे, कोणत्या लयीत फेकावे, त्यात कोणत्या शब्दावर खास आघात असावा, हे आपसूक दादोबांना समजायचं. आवाजातला चढ-उतार नेमका समजायचा. नुसत्या बोलण्यातूनही ते भावविश्व उभे करीत. अभिनयाच्या शाळेत कधीही न शिकलेला हा कलावंत उपजतच अभिनय सम्राट होता.
मराठी रंगभूमी गाजविणारे नटश्रेष्ठ शंकर घोणेकरांनी दादोबांचा तमाशा फडातला अभिनय पहिला होता. तेव्हा ते म्हणाले होते, रसिक हो, तुम्हाला खऱ्या विनोदी कलावंताची ओळख करून द्यायची आहे? रंगमंचावरचा उत्स्फूर्त, सहज सुंदर अभिनय बघायचा आहे? मग आमच्या दादू इंदुरीकरांना एकदा बघाच.
नटश्रेष्ठ शंकर घोणेकर आणि जसराज थिएटरचे सर्वेसर्वा मधुकर नेवाळे यांच्या पाठबळावर दादोबांनी गाढवाचं लग्न सादर केले. त्यावेळी अंगातील सारे कौशल्य ते स्वत:च्या भूमिकेत ओतू लागले. मुद्राभिनय, शरीराच्या लकबी, संवाद फेक, हजर जबाबीपणा, चपळता, लगबग या साऱ्यांना ते वेगळा ढंग भरू लागले. बघता-बघता गाढवाचं लग्न हाउसफुल्ल होऊ लागलं. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या वगनाट्याचा डंका दुमदुमत राहिला. या कलाकृतीने गर्दीचे आणि लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले.
पूर्वीचा अस्खलित तमाशा परंपरेचा बाज दादोबांनी बंदिस्त थिएटरात आणला होता. त्यामुळे शहरी प्रेक्षक आणि ग्रामीण प्रेक्षकही गाढवाच्या लग्नाला अक्षता टाकायला हजर असायचा. हे वगनाट्य लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाले. दादोबांच्या अभिनयावर मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांनी भरभरून रसग्रहण केले. अनेक समीक्षकांनी या मराठमोळ्या वगनाट्याची मोठ्या खुबीनं वाहवा केली. अगदी जपानी कलावंतांनीही ही कलाकृती बघून दादू इंदुरीकरांना मराठीतला चार्ली चॅप्लिन म्हटले. तमाशा कला निषिद्ध मानणाऱ्या, तमाशाचे तोंड पाहण्यास घाबरणाऱ्या पांढरपेशा प्रेक्षक घरातल्या स्त्रिया, मुलांबालांसहीत अपूर्वाईने लग्नात गर्दी करू लागला. लोकनाट्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, वगसम्राट, विनोद सम्राट अशी बिरुदावली प्रख्यात नाटककार विजया मेहता, विजय तेंडुलकर, कुमुद मेहता, वसंत सबनिसांनी दिली. साहित्यिक ना. सी. फडके, अनंत काणेकर, शिरीष पै, आशा भोसले, कविवर्य वसंत बापट, नामदेव ढसाळ, दया पवार अशा कैक प्रभूतींनी दादू इंदुरीकरांचा सन्मान केला. २५ एप्रिल १९७२ ला बेळगावात स्कूल ऑफ कल्चरच्या खुल्या नाट्यगृहात झालेल्या तीनशेव्या प्रयोगाला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, ख्यातनाम साहित्यिक, नाटककार पु. ल. देशपांडे हजर होते. शंकर घोणेकरांनी त्यांना आवर्जून बोलावलं होतं. त्या बद्दलचा आदरभाव व्यक्त करताना पु. ल. म्हणाले, ‘‘वरपांगी अतिशय खोडकर वाटणाऱ्या ह्या माणसाच्या अंत:करणात सहानुभूतीचा निर्मळ झरा वाहतो.’’ इंदुरीकरांच्या मागे तो उभा राहिला. याचं कारण केवळ नटाला साहाय्य करावे एवढंच नाही. तर जिकिरीच्या जीवनात हास्याचे मळे फुलविणाऱ्या कलावंताच्या चेहऱ्यावर आधी हसू फुलावं हा त्यामागचा हेतू होता. दादूच म्हणाल तर रंगभूमीवरचा हा वाघ पण कलादेवतेच्या चरणी तितकाच लीन आहे. रंगमंचावरची धूळ हा त्याचा अबीर बुक्का. तर हास्याच्या
कारंज्यापासून हास्य धबधब्यापर्यंतचे नाना प्रकार ही त्याची कलोपासना आहे.
आपले बोलणे विनोदी करायला त्याला कसल्याही युक्त्या वापराव्या लागत नाहीत की हातवाऱ्यांचा आटापिटा करावा लागत नाही. सहजता नसलेले विनोदवीर प्रेक्षकांना काव आणतात. दिनकर कामण्णामध्ये सहजता होती. गंधर्व कंपनीत तळीरामांचे काम करणाऱ्या भांडारकरांच्यात होती. बबन प्रभूमध्येही होती. तमाशात ही सहजता दादू इंदुरीकरांच्यात आहे. दादोबांचा अभिनयाचा झोक आगळा. बोलण्याचा ढंग वेगळा. प्रत्येक शब्दागणिक हसवणाऱ्या या कलावंताला अभिनय शिकायला कष्ट पडले नसावेत. तो त्याच्या रक्तातच भिनलेला आहे. जनता जनार्दनाच्या पदरात तो करमणुकीचे माप अगदी भरपेट टाकतो.
एखाद्या तमाशा कलावंतास पु. लं. नी उत्स्फूर्तपणे दिलेली दाद म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेला मिळालेली पावतीच होय. मुंबईतल्या गडकरी रंगायतनमध्ये महाकवी ग. दि. माडगूळकरांनाही विशेष निमंत्रित करण्यात आले होते. दादोबांच्या अफलातून अभिनयाबद्दल ते म्हणाले, मी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा मराठीबद्दल मी लिहिलं होतं ‘खट्याळ डोळे, गव्हाळ कांती, उरोज उन्नत, वर्ण सावळा, करडी बोली, भाव कोवळे, मराठीतला ठोक सोहळा’ हा अनुभव प्रत्यक्षात रंगभूमीवरच हे लोकनाट्य पंचवीस-तीस वर्षांनी मला आला. संस्कृतीतलं माधुर्य रसिकांना दाखविणारी कीर्तन कला काय आणि मराठी भूमीतच उपजलेला मराठी तमाशा काय दोनच तत्त्वांवर आधारलेले आहेत. ती म्हणजे जनरंजन आणि जनप्रबोधन. संस्कृत नाटकांत विदूषक असतो. तमाशात तोच सोंगाड्या म्हणून वावरतो. इंदुरीकरांनी असे प्रयोग जरूर करावेत. त्यांना अभिनयाची जाण अप्रतिम आहे. नाट्य रंगभूमीही त्यांनी गाजवावी. हे मराठी माणूसच करू शकतो. दुसऱ्यांना नाही जमणार ते. खालून वर जाणार गाणं, वरून खाली येणारे साहित्य यांचा देखणा मिलाप आज या रंगभूमीवर अवतरला. खूप पाऊस पडल्यावर सगळी झाडं वाढतात. फुलांची, फळांची. नको असलेले तन वाढत. पण त्याच दुःख नको. महाराष्ट्राची रंगभूमी दादू इंदुरीकरांसारख्यांमुळे वर्धिष्णू आहे याचा मला आनंद होतो. ग. दि. मां.ची अशी रोख ठोक पावती म्हणजे सन्मानाचा तुरा होय.
केवळ तमाशा लोकरंगभूमीच नव्हे तर दादू इंदुरीकरांनी पांढरपेशा नाटकाच्या प्रेक्षकांचीही पसंतीची पावती मिळवली. आतून कीर्तन वरून तमाशा, काय पाव्हण बोला मेव्हण, नार असे गुलजार, बाळ्याचा फार्स, रंगीचा हिसका पाटलाला धसका, माझा गाव माझी सत्ता अशा अनेक नाटकातूनही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी रंगभूमीवर व लोकरंगभूमीवर इतकी प्रतिष्ठा, कीर्ती आणि मानसन्मान कोणत्याही कलाकाराला आजवर मिळाला नाही. १९७४ मध्ये संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले. लोकमान्य वग सम्राटाच्या पगडीवर राजमान्यतेचा शिरपेच मिळालेला हा कलावंत म्हणूनच अदभुत.!

७१८०