ग्राहका तुझ्यासाठी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहका तुझ्यासाठी !
ग्राहका तुझ्यासाठी !

ग्राहका तुझ्यासाठी !

sakal_logo
By

सध्याच्या काळात मॉलमधून व ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यात अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची व जागृत राहण्याची आवश्यकता आहे. विशेषतः मॉलमधून खरेदी करताना अधिक काळजी घ्यावयास हवी.
- अरुण वाघमारे, राज्य सचिव, ग्राहक पंचायत

ग्रा हक कायद्याविषयी अज्ञान व ते जाणून घेण्याबाबत केली जाणारी बेफिकीरी या प्रमुख कारणामुळे ग्राहक फसवणुकीचा बळी पडतो. मॉल व दुकानात वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकास देण्यात येणारे बिल तपासून पाहण्याच्या बाबतीत ग्राहक सजग आहे का? मॉल व दुकानात वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकास द्यावयाच्या पिशवीचे शुल्क ग्राहकाच्या बिलात आकारणे कितपत उचित आणि योग्य आहे.
मॉल मधून वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मॉल प्रशासनाकडून वैयक्तिक अपघात विमा घेणे बंधनकारक आहे का अथवा अशा विम्याचा हप्ता ग्राहकाकडून त्याचे संमतीशिवाय वसूल करण्याचा मॉल व्यवस्थापनास अधिकार आहे का?
ग्राहकाने मालाची खरेदी त्याचे निवासस्थान असलेल्या जिल्ह्याचे, राज्याचे कार्यक्षेत्रा बाहेरील ठिकाणाहून केल्यास ग्राहक सदर सेवा पुरवठादाराविरुद्ध त्याचे निवासस्थान असलेल्या जिल्हा, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल करू शकतो का? ग्राहकांनी या सर्व बाबींची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
ग्राहक तक्रारीशी संबंधित ज्या विषयावर राष्ट्रीय ग्राहक आयोगाने निःसंदिग्ध आदेश पारित केलेले आहेत. त्या आदेशांचे वारंवार उल्लंघन सेवा पुरवठादार, मॉल प्रशासन यांच्या कडून होण्यामागची कारणे काय? त्याच विषयात ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत कायम स्वरूपी त्रुटी असण्यामागची प्रमुख कारणे कोणती? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करणे गरजेचे आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जालना यांनी यासंदर्भात नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे. ग्राहकाने आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीवर निकाल देताना आयोगाच्या तिन्ही सदस्यांनी एकमुखी निर्णय पारित करून सदोष सेवा आणि अनुचित, अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब केल्याबद्दल एका मॉलला दंडित केले आहे. जालना येथील रहिवासी तक्रारदार यांनी जाहिरातीमुळे आकर्षित होऊन खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी तक्रारदार महिला ग्राहक काउंटरवर गेली असता मॉलच्या कर्मचाऱ्यांनी महिलेकडे पिशवीचे पैसे मागितले. तथापि मॉलच्या दालनात कोठेही सामान खरेदी केल्यावर तुम्हाला वेगळी पिशवी घ्यावी लागेल असे नमूद केलेले नव्हते. सामान खरेदी केल्यावर ते नेण्यासाठी निःशुल्क पिशवी देणे, अथवा सामान अन्य प्रकारे बांधून देणे ही दुकानदाराची प्राथमिक जबाबदारी असताना देखील ती जबाबदारी पार न पाडता मॉलच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदार ग्राहकास काऊंटरवर कापडी पिशवीचे शुल्क बिलात लावले. तसेच त्याच दिवशी अन्य सामान खरेदीच्या बिलात अपघात विमा रकमेचे शुल्क लावले. परंतु विमा किती
रकमेचा आणि किती कालावधीसाठी आहे. विम्याची मुदत कधी संपणार आदी महत्त्वपूर्ण विषयी कोणतीही माहिती ग्राहकास दिली नाही. त्याचबरोबर विमा शुल्क आकारणी आधी अर्जदाराची पूर्व परवानगी देखील घेतली नाही. मॉलच्या या सदोष सेवेविरुद्ध, तसेच अनुचित, अनिष्ट व्यापारी प्रथांविरोधात पीडित महिला ग्राहकाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली. दाखल कागदपत्रांच्या अवलोकनावरुन आयोगाने ग्राहकाचे तक्रारीवर आदेश पारित केले.
ग्राहकाला माल देण्यासाठी निःशुल्क पिशवी न देणे, तशी सूचना दालनात न लावणे, विक्री केलेल्या पिशवीचे विवरण बिलात सुस्पष्टपणे न देणे, माल नेण्यायोग्य परिस्थितीत ग्राहकास नीट बांधून न देणे, या सर्व बाबी ‘सेवेतील कमतरता’ आणि ‘अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब दर्शवतात’ असे स्पष्ट नमूद केले आणि मॉलवर दंडात्मक कारवाई केली. ग्राहकाचे स्वारस्य, हितसंबंध योग्य मोबदल्याने मिळतील. यासाठी ग्राहकाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि ग्राहकाचा हा हक्क अबाधित राखला जाईल, याविषयी ग्राहकास आश्वासन मिळण्याचा हक्क. अनुचित व्यापारी प्रथा, निर्बंधित व्यापारी प्रथा किंवा ग्राहकाच्या तत्त्वशून्य पिळवणुकीपासून दाद मागण्याचा हक्क. ग्राहक प्रबोधनाचा हक्क आदी ग्राहकांना असलेल्या हक्कांविषयी आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. हे प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरण लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागृत राहण्याची आवश्यकता आहे.