‘आय लव्ह मावळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आय लव्ह मावळ’
‘आय लव्ह मावळ’

‘आय लव्ह मावळ’

sakal_logo
By

मित्रा, तू असाच होतास रे आधीपासून. आजही अगदी तस्साच आहेस. आणि मला खात्री आहे, पुढेही असाच राहशील. तू असा आहेस म्हणूनच तर हक्काने येतो मी तुझ्याजवळ. खूप काही लिहायचं होतं मला तुझ्याबद्दल. पण शब्द तुझ्या मैत्रीपुढे फिके पडायला लागलेत. ते आजकाल जागोजागी उभे केलेत तसले ‘आय लव्ह मावळ’ वगैरे बोर्ड लावून त्यापुढे सेल्फी वगैरे अजिबात काढणार नाही मी. पण एक वचन मात्र नक्की देतो, माझ्यामुळे आपल्या मैत्रीला धक्का लागेल किंवा तुझं नाव खराब होईल असं मी कधीच वागणार नाही. प्रॉमिस!
- संजीव माधव सुळे, वडगाव मावळ

प्रिय मावळ,

दचकलास? दचकू नकोस. तुलाच लिहितोय हे पत्र! अरे मीच काय, पण माझ्यासारख्या कित्येक जणांचा खरा मित्र आहेस तू. खराखुरा, जिवलग मित्र. तसे तर आम्ही सतत माणसांच्या गर्दीतच जगत असतो, पण जेव्हा अगदी मनापासून झालेला आनंद कोणाला तरी सांगावासा वाटतो, तेव्हा आधी तुझ्याचकडे धावत येतो मी. कारण मला माहिती आहे, माझा आनंद बघून ज्याला जराही असूया वाटणार नाही, असा तूच तर आहेस, एकमेव. उलट तू प्रत्येक वेळी तुझ्याकडून होता होईल तो भरच घातलीयस माझ्या आनंदात. जेव्हा मन खूप उदास असतं, अगदी एकांतात जाऊन बसावसं वाटतं, तेव्हा तेव्हा तुझ्याच तर कुशीत शिरलोय मी. मन मोकळं करण्याचं हक्काचं ठिकाण आहेस तू. कारण मला माहितीय, माझी व्यथा ऐकून तू कुत्सितपणे हसणार नाहीस की कुठे बोभाटाही करणार नाहीस.

बरं, ही मैत्री एकतर्फी आहे का, तर मुळीच नाही. तू सुद्धा तर जेव्हा जेव्हा आनंदी होतोस तेव्हा-तेव्हा मलाच तर साद घालून जवळ बोलावतोस. मुक्तपणे तुझा आनंद उधळतोस माझ्यावर तू. जेव्हा कधी तुला जाणवतात झळा उष्णतेच्या, तीव्रपणे, तेव्हाही तू मलाच तर खुणावतोस, आटलेलं धरणाचं पाणी पाहायला. तुझे सगळे रंग अगदी मोकळेपणाने दाखवतोस तू मला. गढूळ पाण्याचा, हिरव्या झाडांचा, करड्या मुरुमाचा, काळ्या मातीचा... तुझे हे रंग बघत बघतच तर लहानाचा मोठा झालोय रे. मग सांग, कधीतरी आपल्या या मैत्रीची दाद म्हणून तुलाही एखादं पत्र मी लिहायला काय हरकत आहे?
आठवतं तुला, एकदा तू आणि मी असेच गप्पा मारत बसलो होतो, बघ लोहगडाच्या पायथ्याशी. किती रंगून, गुंगून गेला होतास तू त्या जुन्या आठवणींमध्ये. जुन्या तरी कशा म्हणू. तुझ्या आयुष्याचा विचार करता अगदी अलीकडचीच घटना म्हणायला हवी. महाराजांनी सुरतेचा खजिना स्वराज्यात याच मार्गाने आणताना त्यांचे बालपणीचे स्नेही व खंदे शिलेदार नारो बापुजी देशपांडे यांनी याच ठिकाणी गाजवलेला पराक्रम, त्यानंतर काही वर्षातच इथूनच थोड्या अंतरावर श्रीमंत महादजी शिंदे आणि त्यांच्या फौजेने इस्टुर फाकडा कसा उडवला त्याची सुरस कथा, या सर्व इतिहासाचा मागोवा घेत हिंडणाऱ्या अप्पांच्या, अर्थात ‘गोनीदां’च्या आठवणी, शिंगरू धनगराने घाटातला रस्ता गोऱ्या सायबाला कसा दाखवला त्याची आठवण असे कितीतरी किस्से सांगत होतास तू. कधी अगदी क्रमबद्ध तर कधी कशाही, पण भरभरून सांगत होतास. जिथे छातीवर कधीकाळी मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा झेलल्या त्याच छातीवरून धावणारी रेल्वे आणि एक्स्प्रेस हायवे याचंही तितकच कौतुक रे तुला.
दूध भात खाऊन मुलं गुटगुटीत होतात म्हणे. मित्रा, तू तर शतकानुशतके आम्हाला दूधदुभतं आणि भात खाऊ घालतोयस. मग या मातीत दणकट देहाचे मल्ल का नाही तयार होणार? आजही पैलवानांच्या हुंकारांनी तालमी घुमतायत, पण जोडीला वेटलिफ्टिंग, बॉडी बिल्डींग यासारखे मर्दानी खेळ ही जगाच्या पाठीवर तुझं नाव काढतायंत. तुझ्या अंगाखांद्यावर उभे असलेल्या लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची अशा अनेक गडकिल्ल्यांवर छत्रपतींनी आवश्यक ते कारखाने काढल्याचा तुला जेवढा अभिमान, तेवढाच अभिमान तुला आजच्या एमआयडीसीबद्दल ही वाटतोय. मित्रा, नव्या जुन्यांशी सारखंच जुळवून घेण्याचा हा तुझा स्वभावच मला जाम आवडतो बघ. तुझ्या अंगणात जागोजागी वाहणाऱ्या नद्या, धबधबे, ओहोळ यांना तू जितक्या आपुलकीने वागवतोस तितक्याच आपुलकीने आम्ही या पाण्याला अडवण्यासाठी बांधलेली धरणं, बांध हे ही सांभाळतोस. सगळ्या गोष्टीवर सर्वकाळ फक्त प्रेमच करणारा तुझ्यासारखा तूच.

मला तरी आठवत नाही, आजवर कधी तू खूप रागावलायस, रुसलायस. ना भूकंप, ना महापूर, ना दुष्काळ, ना दंगली ! जराही तुझा तोल ढळलेला आठवत नाही मला. खरं तर मीच किती त्रास देतो तुला. कधी पर्यटनाच्या नावाखाली तुझ्या सर्वांगावर कचरा करून ठेवतो, कधी दगड शोधत तुझ्या पोटात शिरतो, कधी मुरूम हवा म्हणून तुझे डोंगर पोखरतो, रिसोर्टच्या नावाखाली झाडं तोडतो. कितीतरी छळतो मी तुला. पण तू त्यावर एका शब्दानेही तक्रार करत नाहीस. पण सगळेच माझ्यासारखे नाहीत हं! काही वेडी लोकंही आहेत इथे. मग त्यातलंच कोणी दुर्गम भागात विहिरी खोदतो, कोणी वृक्षारोपण करतो, कोणी गडकिल्ल्याचं संवर्धन करतं तर कोणी कलेचं संवर्धन करतं. अशा गुणी मित्रांना तर तू अक्षरशः डोक्यावर घेऊन कौतुक करतोस. म्हणूनच तर मग इथले उरुस असोत वा सामाजिक उपक्रम, उत्साहाचे झरे तू कधी ओस पडू देत नाहीस.
मित्रा, तू असाच होतास रे आधीपासून. आजही अगदी तस्साच आहेस. आणि मला खात्री आहे, पुढेही असाच राहशील. तू असा आहेस म्हणूनच तर हक्काने येतो मी तुझ्याजवळ. खूप काही लिहायचं होतं मला तुझ्याबद्दल. पण शब्द तुझ्या मैत्रीपुढे फिके पडायला लागलेत. ते आजकाल जागोजागी उभे केलेत तसले ‘आय लव्ह मावळ’ वगैरे बोर्ड लावून त्यापुढे सेल्फी वगैरे अजिबात काढणार नाही मी. पण एक वचन मात्र नक्की देतो, माझ्यामुळे आपल्या मैत्रीला धक्का लागेल किंवा तुझं नाव खराब होईल असं मी कधीच वागणार नाही. प्रॉमिस! पत्र हे पत्रच असावं, निबंध नसावा हे समजून थांबतो इथेच. लोभ आहेच, आणि तो सतत वृद्धिंगत होणारच ! काळजी घे, बाय !
तुझाच