मावळचा इंद्रायणी ब्रँड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळचा इंद्रायणी ब्रँड
मावळचा इंद्रायणी ब्रँड

मावळचा इंद्रायणी ब्रँड

sakal_logo
By

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या व ग्राहकांची सर्वाधिक पसंती असलेल्या इंद्रायणी भाताची विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून ग्राहकांना भेसळमुक्त ब्रँडेड तांदूळ विक्री करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही मोठा फायदा होणार आहे.
- माऊली दाभाडे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

म हाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी हा पायाभूत आधार आहे. किंबहुना सहकारातील त्रिपक्षीय (राज्य बँक, जिल्हा बँक, विकास सोसायटी) रचनेतील शेवटची पायरी विविध कार्यकारी सोसायटी ही आहे. केरळ राज्यात विविध कार्यकारी सोसायटीला बँक म्हणूनच संबोधले जाते. इतकी ग्रामीण जनतेची नाळ विविध कार्यकारी सोसायटीशी जोडलेली आहे. आज महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतीपूरक कर्ज, शेती अवजारासाठी कर्जाबरोबरच दूग्ध व्यवसाय, शेळी पालन, म्हैस पालन यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, खेड, आंबेगाव व जुन्नर या सहा तालुक्यातील डोंगरपट्ट्यामध्ये भात हेच आजही मुख्य पीक आहे. वीस वर्षांपूर्वी मावळमध्ये आंबेमोहोर आणि आय.आर.२२ यांच्या संकरापासून इंद्रायणी या वाणाची निर्मिती करण्यात आली. मावळ तालुक्यामध्ये आजमितीला ९५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी या वाणाचीच लागवड केली जाते. इंद्रायणी भात हे मध्यम उंचीला वाढते. इतर जातीच्या वाणापेक्षा उत्पन्नही अधिक मिळते. इंद्रायणी तांदूळ सुगंधी असून, त्याला रुचकर स्वाद आहे. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. महाराष्ट्रात सर्व दूर त्याची ख्याती पसरलेली आहे. परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये भातापासून तयार केलेल्या इंद्रायणी तांदळामध्ये कधी रेशन तांदळाची तर कधी हलक्या प्रतिच्या वाणाची भेसळ करून भेसळयुक्त तांदळाची विक्री केली जाते, अशा तक्रारी आहेत. हा भेसळ युक्त तांदूळ कमी प्रतीचा किंबहुना कमी दर्जाचा असला तरी इंद्रायणीच्या मूलभूत सुगंधामुळे भेसळयुक्त तांदळाला देखील सुगंध येतो. नफेखोर व भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे इंद्रायणी तांदूळ उच्च प्रतीचा असून सुद्धा त्याची मार्केट किंमत कमी झाली आहे व त्याचा एकत्रित फटका इंद्रायणी भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. त्याला दर कमी मिळत आहे. त्याची प्रत कमी झाली म्हणजे सोन्याला तांबे किंवा कथलाचा दर्जा प्राप्त होतो व रेटही तोच मिळतो. गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे काम म्हणजे केवळ कर्जपुरवठा करणे एवढेच नसून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, कीटकनाशके, औषधे पुरवठा करण्याबरोबरच सुगी पश्चात विक्रीचे सुद्धा कर्तव्य अंतर्भूत आहे. परंतु अधिकारी, पदाधिकारी, सेवक वर्ग सहकाराकडे डोळसपणे न पाहता अक्षम्य दुर्लक्ष करून सुगी पश्चात शेतीमाल विक्रीकडे दुर्लक्ष करतो. त्याचाच परिणाम म्हणून मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ जो पंजाबच्या बासमतीबरोबर गुणात्मकरित्या स्पर्धा करणारा असून देखील त्याची मातीमोल दराने खरेदी-विक्री होते. ही बाब हेरून त्यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून भात खरेदीचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आम्ही मावळमध्ये काम करणारे बँक सेवक, सचिव, अध्यक्ष, पंच कमिटी व सहकारातील सर्व कार्यकर्ते मिळून मावळ तालुक्यात उत्पादित झालेला सर्व इंद्रायणी भात विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरेदी करणार असून कामशेत येथील श्रीराम मिलमध्ये तांदूळ तयार करणार आहोत व मावळ वैभव सुगंधी तांदूळ या ब्रँडने त्याची शहरातील गृह रचना सोसायट्या, मॉल आदी ठिकाणी त्याची विक्री करणार आहोत. भविष्यात पेटंट घेऊन परदेशी निर्यातीचाही मानस आहे. भात खरेदी करत असताना सरकारने जरी भातासाठी (साळ) २० रुपये ६० पैसे प्रति किलो हा हमीभाव ठरवला असला तरी आम्ही सोसायटीच्या माध्यमातून प्रति किलो २४ रुपये दराने खरेदी करणार आहोत. श्रीराम मिलमधून तांदूळ उत्पादन करून महाराष्ट्राच्या जनतेला व चवीने खाणाऱ्या खवय्याला निर्भेळ, सुगंधी व स्वादिष्ट प्रसिद्ध असा इंद्रायणी तांदूळ वाजवी दरात उपलब्ध करून देणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर दर व ग्राहकांना वाजवी दरात निर्भेळ सुगंधी तांदूळ मिळेल.
या उपक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने हाती घेतलेला नावीन्यपूर्ण उपक्रम शेतकऱ्यांना निश्चितच वरदायी ठरेल व महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना पथदर्शी होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनुकरण सहकारातील इतर बँका करतील. भविष्यकाळात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात भात खरेदी-विक्रीबरोबरच सोयाबीन खरेदी करून सोयाबीनची ऑइल मिल हा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. भात खरेदीचा उपक्रम मावळ तालुक्यात सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(शब्दांकन - ज्ञानेश्वर वाघमारे)