हवेशीर साते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवेशीर साते
हवेशीर साते

हवेशीर साते

sakal_logo
By

साते गाव हे शहरी जीवनाच्या गजबजाटापासून दूर असलेले ग्रामीण ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील तालुक्याच्या गावाजवळ असणारे ऐतिहासिक असे साते गाव. याच गावात स्वराज्याचे २१ वर्ष पंतप्रधान असलेले श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा जन्म ६ डिसेंबर १७२१ रोजी झाला. याच नानासाहेबांनी विविध प्रकल्प करून पुण्याचा कायापालट केला त्यात प्रामुख्याने लाकडी पूल, कात्रज ते पुणे पाण्याची पाइपलाइन, शनिवारवाड्याचे प्रवेशद्वार अशी विविध कामे नानासाहेबांनी पूर्ण केली. नुकतेच त्यांची तिनशेवी जयंती मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी साजरी केली.
- तुकाराम आगळमे, साते

गा वात अनेक आढळून येतात. सती गेलेल्या महिलांची स्मृती या ठिकाणी आढळते. लढताना वीरमरण आलेल्या मावळ्यांचे शिळामध्ये प्रतीक म्हणून आढळते. मनाला शांती देणारे वाघजाई मंदिर हे ठिकाण आहे. येथे विविध प्रकारची, फुले, फळे तसेच हिरवीगार झाडे आढळतात. येथे कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान आल्हाददायक आणि हवेशीर आहे.

गावात शेती पिकांचे उत्पन्न हे मुख्य स्रोत आहेत. ताजा भाजीपाला, कडधान्य इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात. इंद्रायणी भात आणि ज्वारी पीक विक्रमी घेतले जाते. गावातील लोक खूप मनमिळाऊ आणि आपापसांत प्रेमाने राहतात. येथील थंड वारा आणि मातीचा वास आनंददायक आहे.

साते गाव, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी, विनोदेवाडी मिळून बनलेली ग्रामपंचायत. चार-पाच वर्षांत गावांत बऱ्यापैकी सुधारणा झाली. तसं पाहिलं तर सर्व सूख सुविधा गावाला मिळाल्या. जे मिळालं ते नाही कशाला म्हणायचं. लोकांची सवय असते नुसते रडायचे गावाला हे नाही ते नाही. जे आहे त्यात सुधारणा नाही. पण, प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की गावातली सर्व राजकीय पुढाऱ्यांनी गावच्या विकासाला हातभार लावला आहे. गावातली स्वच्छ आणि मोठी मंदिरे, पुरातन विहिरी, जिल्हा परिषदेची आदर्श शाळा, माध्यमिक हायस्कूल, गावात प्रशस्त रस्ते, हायवे ते गाव येण्यासाठी प्रशस्त सिमेंट रस्ता, वाहनतळासाठी जागा, तसेच आर्थिक व्यवहारासाठी ‘अ’ श्रेणी प्राप्त असलेल्या दोन पतसंस्था गावातच आहेत. जीवनावश्यक सर्व वस्तू गावातच मिळू लागल्याने सर्व गावकरी खूष आहेत. उच्चशिक्षित तरुण आधुनिक पद्धतीने शेती करताना पाहायला मिळतात, तसेच स्पर्धा परीक्षाची अभ्यास करणारी मुले प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. गावातच विविध कला असणारे कारागीर काम करतात, जसे की काही बांधकाम प्रकल्प आहेत, गोडाऊन आहेत, उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आहेत. येथे सर्व प्रकारचे कामगार लागतात. मग काय गावात जे काही कुशल-अकुशल कामगार आहेत, त्यांची ही व्यवस्था झाली म्हणेन सर्व युवक वर्ग समाधानी आहे.

सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपलाय या गावाने कारण गेली ४० वर्ष अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होतो. कार्तिकी एकादशीनिमित्त कोकणातून आलेल्या दिंडीचे स्वागत आणि एक दिवसीय मुक्काम सेवा अखंड श्री दत्त मंदिर येथे चालू असते. दररोज मंदिरात ग्रामस्थांकडून हरिपाठ होतो. दर एकादशीच्या दिवशी भजन होते. चैत्र पौर्णिमाला ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहाने पूर्ण होते. स्वाध्याय परिवाराच्या विचाराने ज्ञान, कर्म, भक्तीचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. येथील युवक सकाळी सूर्यनमस्कार करून दिवसाची सुरुवात करतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाननिमित्त संपूर्ण महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो, तर नवरात्री उत्सवात दुर्गा माता दौडचे आयोजन येथे पाहायला मिळते. गावातील युवक आणि युवती मिळून गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तूचे परिसर स्वच्छ करण्यासाठी सातत्याने क्रियाशील असतात.

येथील घरे बहुतेक मातीची होती, पण या अलीकडच्या काळात पक्की घरे पहावयास मिळतात. शेतीसुद्धा आधुनिक पद्धतीने करण्याचा कल युवक वर्गाचा असतो. जोडधंदा म्हणून पूर्वीपासूनच दूध व्यवसाय केला जातो. गावात भरपूर गायी आणि म्हशी आणि बैल पाहायला मिळतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूर्वी रस्ते कच्चे असायचे, पाणी विहिरीवरून डोक्यावर आणले जायचे, बाहेर गावी
जाण्यासाठी वाहने नसायची, संपर्क लवकर होत नव्हता. पण आता मात्र हे चित्र बदलले. जर्मनीपासून परभणी आणि अमेरिकेपासून आजिवली गावची माहिती आता मोबाईलवर मिळू लागली. सुसज्ज रस्ते, पाण्याच्या पाइपलाइनचे विस्तृत जाळे हा गावचा बदल नक्की झाला.

आमचे गाव अलीकडील काही वर्षात खूप सुधारले आहे. जवळच्या शहराशी आमचा रस्ता चांगला आहे. गावातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा ही आदर्श विद्यार्थी घडवत आहे. गावापासून अगदी १० मिनिटांच्या अंतरावर शासकीय आणि खासगी रुग्णालय आणि उच्च शिक्षणासाठी शाळा तसेच शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, मुंबई पुणे रस्ता, आठवडे बाजार असं सर्व काही मोजून १० मिनीट अंतरावर आहे. अगदी नदीवर पोहण्यासाठी जायचे म्हणलं तरी १० मिनीट लागतात आणि समोर दिसते ते विस्तीर्ण इंद्रायणी नदीचं पात्र.

दरवर्षी जोरदार पावसाचा सामना करावा लागत असला, तरी गावाच्या भौगोलिक वैशिष्ट्यात बदल झालेला नाही. असे मानले जाते की ग्रामदैवत असलेले भगवान श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि गावदेवी वाघजाई माता सर्व प्रकारच्या संकटात या गावाचे रक्षण करतात. असं आहे आमचा साते गाव.

गावाची शिव दिसताक्षणी हर्ष दाटतो मनामनात उमलूनी पाकळीचे फूल होते त्याच क्षणा क्षणात ||१||
वाटा अनेक वाकड्या जाईल थेट आपुल्या गावात
नको नको तुम्हा वाटाड्या देव भेटेल वाटेत ||२||
ऐकत सुर पाखरांचे वाट कधीच संपते
दारात उभ्या माऊलीचे दर्शन मजला घडते ||३||