‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’
‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’

‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’

sakal_logo
By

‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’

- निरंजननाथ गुरू शांतीनाथ

‘जिथे देव आणि नाम असेल तिथे अहंकार येईल का?’ संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय महाराज अभंगवाणीमध्ये म्हणतात, ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’, यांत नवल असे वाटते की, त्यांना अहंकाराचा वारा असे म्हणताना नक्की काय अपेक्षित असेल? जेव्हा थोडी तळमळ दाखविली त्यावेळी लक्षात आले की, यासाठी आपल्याला लोखंडाचे उदाहरण घ्यावे लागेल. लोखंड तसे मजबूत आणि टिकाऊ, पण त्याला नुकसान पोहोचविणारा त्याचा स्वत:चाच स्वभाव असतो. लोखंडाला त्याचे स्वतःचा गंजच नष्ट करतो. आता या अहंकाराच्या वाऱ्याचा आणि लोखंडाला गंज चढण्याचा संबंध काय? तर लोखंडाला पाण्यात ठेवले असता लोखंड तेवढे सडत नाही आणि त्याला गंज पण चढत नाही. पण, पदार्थविज्ञानाच्यादृष्टीने या लोखंडाला सर्वांत लवकर नष्ट करणारा गंज कशाने लागत असेल, तर तो लागतो वाऱ्याने. वाऱ्याच्या संगती हे लोखंड फार लवकर गंज चढते आणि स्वतःचे नुकसान करते. तसे लोखंड हे त्याच्या मजबुतीसाठी आणि टाकाऊपणासाठी ओळखले जाते. या लोखंडाला अति टिकाऊ बनविणारा त्याचा स्वतःचा स्वभाव असतो. मग या विशेषाला फक्त वारा लागल्याने काय होत असेल का? या लोखंडाच्या डोक्यात वारा घुसल्याने गंज चढत असेल का? पण, याच जर लोखंडाला चांगले वंगण किंवा आवरण लागले, तर तो वारा त्याच्यावर परिणाम करू शकतो? कारण या लोखंडाच्या आणि वाऱ्याच्या संयोगात अडथळा निर्माण करणारा रंग असेल किंवा वंगण असेल तर कोण मधांत येणार?

श्रीनामदेवराय महाराजांना हेच सांगायचे आहे की, आम्हीसुद्धा कुठेतरी या लोखंडासारखेच आहोत. अगदी श्रीज्ञानोबाराय महाराजसुद्धा आम्हाला एके ठिकाणी सांगतात की, भगवंताची जी प्रेमकृपा आहे, ती चुंबक आहे आणि आपण सगळे कोण आहोत, तर लोखंड आहोत. आपण स्वतःला लोखंड जर समजलं, तर नक्कीच स्वतःचे अस्तित्व वेगळ्या परीने मानणारे, अहंकाराच्या व्यवहाराच्या नादी लागून स्वतःला भलतच काही समजणारे देहसत्ता माझ्यापेक्षा मोठी नाही. मी जे काही आहे, ते मात्र देहच आहे. आणि या देहातून होणारी सर्व कार्ये करणारादेखील मीच आहे. हा वारा जर लागला तर त्या लोखंडाचा नाश आहे की नाही? जर लोखंड मी आहे आणि देहाचा अहंकार तो वारा आहे. तर या दोघांत कुठेतरी समर्पण आणि भक्तीचे वंगण लागल्यास हे लोखंड वाचेल की नाही? आणि हे वंगणच लावण्यासाठी किंवा निदर्शित करण्यासाठी नामदेवराय महाराज यांनी अहंकाराचा वारा हा शब्द उपयोगात आणला आहे.

वारं जर डोक्यात घुसलं, तर जन्म वाया जातो. नुसताच जन्म नाही, तर जन्म जन्म वाया जातात. त्यासाठीच आम्ही जन्मोजन्मी मात्र आणि मात्र हा वारा आमच्या कानात न घुसावा. एखादे वासरू धडाधड उड्या मारते. इकडे-तिकडे भटकत राहते. कुठेतरी एका ठिकाणी न थांबत विचलित होत जाते. त्यावेळेस आपल्याला कुणी तरी सांगत की, त्याच्या डोक्यात, कानात वारा घुसला आहे. म्हणून जेव्हा कधी विचलित माणसे पाहिली. विचारांनी सगळीकडून सर्व माणसे दाटलेली पाहिली की, समजून जावे. त्यांच्या कानातसुद्धा अहंकाराचाच वारा घुसला आहे. तो न घुसावा म्हणून या कानात ‘सततम किर्तयंतु माम’ असे काहीतरी शब्द पडावेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पडाव्यात. नामदेवरायांची गाथा असावी. एकनाथ महाराजांचे अभंग असावेत. मुक्ताईंचे प्रमाण असावे. या डोक्यात आणि कानांमध्ये वारं शिरूच शकणार नाही. तिथे स्वतः भगवंत त्या कानांमध्ये बसून त्या लोखंडरूपी देहाला अहंकाररूपी गंजापासून वाचवेलच.

एक गोष्ट मला अतिशय प्रकर्षाने जाणवली की, या जगात कोणी काहीही शिकवायला जावे, ते सर्व ज्ञानोबांपासूनच उत्पन्न आहे. मी अजूनही विद्यार्थ्यांना सांगत असतो. तुम्ही ज्ञानेश्वरीची साथ सोडू नका. ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळ्या गोष्टी जोडून देईल. एक ज्ञानदेवांचा हात पकडा. तुम्हाला सर्व ग्रंथ शरण येतील. श्रीज्ञानोबाराय विज्ञानाच्या बाबतीत बोलले. पण, त्यापेक्षा मानसिकतेबाबत बोलले हे महत्त्वाचे आहे. विज्ञान सर्व काही करू शकते. पण, तुमचे विचार ठिक करू शकते का? विज्ञानापेक्षा अज्ञान आणि सज्ञान या फार मोठ्या गोष्टी आहेत. आपल्याला विज्ञानाने, कृत्रिम सज्ञानाने बिघडविले आहे. नामदेवराय म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आणि ते मिळवायचा प्रयत्न करावा. दिवाळी म्हणजे दिवे
लावा, फटाके फोडा, सण साजरा करा असे नव्हे. नामदेवराय आम्हाला सांगतात की, दररोज वर्तमान क्षणात कसे जगायचे? आणि ते जगताना दिवाळी कशी साजरी करायची. लोक सांगतील की, दिवे लावले गेले. वाती पेटविल्या गेल्या. फटाके फोडले गेले. सडा शिंपडला गेला. रांगोळी काढली गेली. सुवासिक तेलाने अंघोळ केली आणि माझी दिवाळी साजरी झाली. किंतू, नामदेव महाराज यांना दिवाळी कशी अपेक्षित आहे. दिवाळीला कुठलाही व्यापारी आदल्यावर्षीची चोपडी बंद करून नव्या वर्षाची चोपडी सुरू करते. नामदेव महाराजांना अपेक्षित एकच होतं की, झाले गेले विसरून जावे. पुढे पुढे चालावे. रोजची जबाबदारी घेऊन रोजचे खाते नवीन तयार करा. कुठल्या गोष्टींची सोय करू नका. कुठल्या गोष्टींची चिंता करू नका.

नामदेवराय महाराजांनी आम्हाला दिवाळीचे महत्त्व काय सांगितले. तर नामदेवराय म्हणतात की, नुसते दिवे लावले तर दिवाळी साजरी होत नाही. नुसत्या कृत्रिम प्रकाशाने दिवा लागून त्याने उजेड होत नाही. खरा दिवा, खऱ्या प्रकाशाचा ज्ञानाचा प्रकाश हा साधू-संत घरात आल्यावर होतो. त्यामुळे साधू-संतांचा नित्य संपर्क राहील. दिव्याचा प्रकाशाच्या तुम्ही नित्य संपर्कात राहाल, अशी सुविधा-सोय करून ठेवा. दररोज तुमच्या घरी संतांचे पाय पडले पाहिजेत. त्यांच्या येण्याने ज्ञानमय जो प्रकाश येईल, ती खरी दिवाळी असेल. नामदेवरायांना अपेक्षित जी दिवाळी आहे, ती दारूगोळ्याच्या फटाक्यांची नाही, तर संतसाहित्य, संतसेवेने आणि संगतीने सुविचारांचे जे फटाके फुटतील, त्याची दिवाळी अपेक्षित आहे. ज्ञानदेव आणि नामदेव यांना नामाचे उटणे लावावे. त्याने, शरीराचा वासनेचा, क्रोध, दंभाचा सगळा मळ निघून जातो. हे सगळं होत असताना अभ्यंगस्नान व्हावं. आणि ते अभ्यंगस्नान कुठले? तर ‘भक्तीचीये पोटी, बोध काकडा ज्योती’ त्या भक्तीच्या पोटी सकाळचे अभ्यंगस्नान व्हावे. त्या अभ्यंगस्नानात कुठेतरी समर्पणाचे जल अंगावर पडून त्यातून विटाळ, वासना बाहेर निघून मनुष्य शुद्ध होऊन गुरुकृपारुपी चंदन आपल्या आज्ञाचक्रावर लावून त्या आज्ञेत भगवंताच्या समोर जावा. आणि खरेच यासाठीच तो विठ्ठल कंबरेवर हात ठेवून उभा आहे. तुम्हाला ओवाळायला. तुमचे अभिनंदन करायला तो विठ्ठल उभा आहे. परंतु, ही दिवाळी साजरी करायला आपल्याला या पद्धतीनेसुद्धा विचार करावा लागेल. संत शब्दांमधून संकेत देतात. ते संकेत समजून घेण्यासाठीसुद्धा ज्ञानाची नव्हे, प्रेमाची गरज असते. हा प्रेमाचाच फराळ आम्हाला सगळ्या संतांनी दिला. ज्यामध्ये प्रेम व भक्ती आहे. अशा प्रत्येक भक्तासाठी हा फराळ दररोजचा स्वतः भगवंताने वाढून दिला आहे, त्याची दिवाळी हीदेखील दररोजचीच आहे.

ज्ञानोबाराय समुद्राचे उदाहरण देताना त्याच्या सपाटीपासून त्या प्रकरणाची, त्या निमित्ताची उंची किती आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. कारण, समुद्राचा तळ हा पाया आहे. ती नम्रता, अध्यात्म, साधना आणि समाधीची खरी जागा आहे. समुद्राचा तळ हा आजपर्यंत का शोधू शकलो नाही. कारण, ज्या व्यक्तीची आध्यात्मिक विचारांची खोली जेवढी प्रगाढ असते. तो तेवढाच शांत. परंतु, क्रांतिकारक असतो. हा समुद्र अजूनपर्यंत कोणालाच कळालेला नाही. इतका अथांग आणि खोल आहे. समुद्राचे दुसरे वैशिष्‍ट्य ज्ञानोबारायांना असे दाखवायचे आहे की, हा समुद्र स्वतःमध्ये काही स्वीकारत नाही. एखादी बाहेरची व्यक्ती आली किंवा एखादा बाहेरचा प्राणी आला, त्याला तो बाहेरच फेकतो. या समुद्रालासुद्धा भावना आहेत. या समुद्राचे नाते कुणाशी आहे? तर ज्ञानोबाराय या समुद्राला चंद्राचा पिता असे म्हणतात. पूर्णत्वाला आलेला चंद्र पाहायला जेव्हा समुद्र बाहेर येतो. तेव्हा, आनंदाने तो उचंबळून येतो. तेव्हा, ज्ञानोबाराय म्हणतात तेव्हा भरती येते. आणि ज्यावेळेस अमावस्येला हा चंद्र काळोखात गडप होतो. असलेला परंतु, नसलेला तो असतो. त्यावेळेस, हाच समुद्र स्वतःला आटवून घेतो. संकोच करून घेतो. म्हणतो माझे लेकरू कुठे आहे. या समुद्रानेच आम्हाला अमृत दिले. म्हणूनच त्याला समुद्रमंथन म्हणतो. जेव्हा -जेव्हा आम्ही विचारांच्या समुद्राचे मंथन करतो. त्यावेळी चांगल्या-वाईट विचारांच्यासोबत त्या परिश्रमातून, त्या कर्तृत्वातून त्या मंथनातून आम्हाला अमृतच मिळणार. याच समुद्र मंथनातून मिळालेल्या हलाहलाला पिऊन भगवान शंकर निळकंठ झाले. संपूर्ण जगाला साधना आणि संपत्ती देणारी लक्ष्मीसुद्धा यांचीच मुलगी. आणि गाईला आपण माता मानतो. वसुंधरेला जेव्हा गाईच्या कृपेने भागवत धर्मात महापुराणात पाहतो, तेव्हा तिला कामधेनू म्हटले जाते. ती कामधेनूसुद्धा या समुद्रानेच आम्हाला दिली. मग, इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी व्याख्या केलेला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी स्वभावांचा समुद्र ज्ञानोबांना का आवडणार नाही? कारण, ज्ञानोबा स्वतःच ज्ञानाचा सागर आहे.