
शेतात उतरलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी
माळेगाव, ता. २ ः खांडज हद्दीतून गुरुवारी (ता. १) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्यातून सोलापूर मार्गे हैदराबादला दोन इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॉप्टर निघाले होते. त्यापैकी एका हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये काहीसा बिघाड झाल्याचे पायलट गायत्री यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खांडज-नीरावागज रोड लगत असलेल्या मोकळ्या शिवारात सदरचे हेलिकॉप्टर उतरविले. त्याचवेळी पुढे गेलेले इंडियन एअर फोर्सचे दुसरे हेलिकॉप्टर पुन्हा माघारी आले आणि घटनास्थळी उतरले. अचानक हेलिकॉप्टर शिवारात उतरल्याचे समजताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
दरम्यान, टेक्निशन जवानांनी युद्धपातळीवर नादुरूस्त हेलिकॉप्टर दुरुस्त केले. दुपारी एकच्या सुमारास दुरुस्त झालेले हेलिकॉप्टर पुण्याच्या दिशेने रवाना झाले, तर मदतकार्यासाठी आलेले हेलिकॉप्टर हैदराबादला निघून गेले, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने अधिकृतरीत्या सांगण्यात आली. हेलिकॉप्टरमध्ये महिला पायलटसह चार जवान होते. या घटनेत कोणतीही जीवत अथवा वित्त हानी झाली नाही.
खांडज-निरावागज रोडच्या उजव्या बाजूस हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या मोकळ्या शिवारात आज गुरुवारी सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरचे तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंग झाले. बिघाड निघेपर्यंत पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षितता हाताळली. पुण्यात एनडीए परेडसाठी इंडियन एअर फोर्सचे दोन चेतक हेलिकॉप्टर आले होते. त्यानुसार ती दोन्ही हेलिकॉप्टर पुन्हा हैदराबादकडे निघाली असता एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.’’
-किरण अवचर, पोलिस निरिक्षक
खांडज गावात सकाळी अचानक हेलिकॉप्टर उतरले आणि गावात एकच पळापळ झाली. अनेकांनी शिवारात धाव घेतली. पोलिस पाटील मुनेश राऊत यांनी माळेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघाताने उतरलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
-नितीन आटोळे, गावकरी ग्रामस्थ