‘व्यंकटेशकृपा’ बंद पाडण्याचे राजकारण करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्यंकटेशकृपा’ बंद पाडण्याचे 
राजकारण करू नका
‘व्यंकटेशकृपा’ बंद पाडण्याचे राजकारण करू नका

‘व्यंकटेशकृपा’ बंद पाडण्याचे राजकारण करू नका

sakal_logo
By

सणसवाडी, ता. ४ ः व्यंकटेशकृपा साखर कारखाना बंद पाडण्याचे राजकारण करू नका, शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी खेळू नका. तुमची लढाई तिकडे एमआयडीसीत लढा. व्यंकटेश बद्दल बोलाल तर शिक्रापूर परिसरातील १५ गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरून तुम्हालाच हद्दपार करतील असा इशारा देत शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांचा जाहीर निषेध केला.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स कारखान्याने शासन कर थकविणे व तत्सम काही अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करून कारखाना बेकायदा असल्याचा आरोप पाचंगे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता व कारखान्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून शेतकरी एकत्र आले व तीव्र संताप व्यक्त करीत त्यांनी वरील इशारा दिला.
दरम्यान, चासकमानमुळे तब्बल ३५ लाख टनांपर्यंत वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे इतर तालुक्यातील साखर कारखान्यांनी शिरूरच्या शेतकऱ्यांना वेठीस धरले असताना तालुक्यात व्यंकटेशकृपा उभा राहिला. मात्र, एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये आंदोलन करणारे भाजपचे संजय पाचंगे व्यंकटेशकडे का वळाले याचे कोडे तालुक्याला आता पडले. पाचंगेंनी आता शेतकरी विरोधी भूमिका बदलून व्यंकटेश करीत असलेल्या सुमारे साडेसात लाख टन ऊस गाळपाला पर्याय काय याचे उत्तर पहिल्यांदा द्यावे मगच असले उद्योग करावेत, असा सल्लाही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
चांगला कारखाना बंद पाडण्याचे उद्योग पाचंगे यांनी तत्काळ न थांबविल्यास परिसरातील १५ गावातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराच यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी जातेगाव येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्हाला कारखान्याचा कसलाही त्रास नाही, उलट कारखान्यामध्ये प्रक्रिया केलेले पाणी मी शेतीसाठी वापरत आहे. जर कारखाना बंद पडला तर मी ऊस कोणाकडे घालू, माझ्या नुकसानीला कोण जबाबदार असा प्रश्न जातेगावचे शेतकरी अंकुश उमाप यांनी विचारला.
यावेळी शेतकरी संभाजी धुमाळ, गणेश शेळके, शिवाजी भोंडवे, अप्पा मांजरे, हनुमंत पवार, नानासाहेब इंगवले, अंकुश उमाप, नवनाथ शिवले, सोमाजी क्षीरसागर, सुरेश इंगवले, राजेंद्र गव्हाणे, साहेबराव भंडारे, माजी सरपंच शिवाजी जगताप, नीलेश जगताप आदींनी तीव्र भाषेत पाचंगे यांचा निषेध नोंदविला.

तुम्हाला म्हणूनच शेतकऱ्यांनी नाकारले
शेतकरी हिताच्या विरोधामुळे तुम्हाला घोडगंगामध्ये पुन्हा नाकारलेय. त्याचा राग आता व्यंकटेशवर काढू नका असे म्हणत तुम्ही एखादा कारखाना सुरू करा चांगला बाजारभाव द्या आम्ही तुम्हाला ऊस देऊ असा सल्लाही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.