विद्यार्थ्यांनी घेतले शेती व्यवस्थापनाचे धडे निमोणे, निर्वी, कुरुळी ः शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतात पार पडली फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी घेतले शेती व्यवस्थापनाचे धडे
निमोणे, निर्वी, कुरुळी ः शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतात पार पडली फेरी
विद्यार्थ्यांनी घेतले शेती व्यवस्थापनाचे धडे निमोणे, निर्वी, कुरुळी ः शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतात पार पडली फेरी

विद्यार्थ्यांनी घेतले शेती व्यवस्थापनाचे धडे निमोणे, निर्वी, कुरुळी ः शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतात पार पडली फेरी

sakal_logo
By

गुनाट, ता. १९ ः शेती आणि शेतीविषयक तंत्रज्ञान, पिके घेण्याची पद्धत, पिकांचे व मजुरांचे व्यवस्थापन, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती, फवारणीचे तंत्रज्ञान, खतांचे व्यवस्थापन, पिकविलेल्या शेतमालाच्या विक्रीची कौशल्य, शेतीपुढील आव्हाने या सर्व बाबींचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच मिळावे यासाठी शिरूर येथील ज्ञानगंगा एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजच्या क्रॉप सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांची शिवार फेरी आयोजित केली होती.
निमोणे, निर्वी, कुरुळी या गावांतील शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतात मोठ्या उत्साहात ही फेरी पार पडली. या वेळी विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेती कामाचा अनुभव घेतला. कॉलेजच्या ‘एक दिवस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी’ या उपक्रमांतर्गत निमोणे (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध द्राक्ष उत्पादक गणेश काळे यांच्या द्राक्ष शेतात पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली व विदेशातही निर्यात होणाऱ्या द्राक्ष शेतीची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. तर, कुरुळी येथील किरण भापकर यांच्या अद्ययावत असलेले पॉली हाऊस, शेडनेटमधील रोपवाटिका व त्या रोपवाटिकांमध्ये असणारी विविध प्रकारची रोपे यांचाही अभ्यास केला. निर्वी येथील नंदकुमार सोनवणे यांच्या सेंद्रिय पद्धतीने गूळ बनवणाऱ्या गुऱ्हाळालाही विद्यार्थ्यांनी भेट देत गूळ बनवण्याच्या प्रक्रिया व पद्धती जाणून घेतल्या. ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख प्रा. राजेराम घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. माधुरी भगत, प्रा. सुधीर शिंदे, किशोर जगताप तसेच, कृषी सहायक जयवंत भगत यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

ग्रामीण शेतीव्यवस्था ही एक खूप मोठी जागतिक अर्थव्यवस्था व बाजारपेठ आहे. या शेती व्यवसायातही विद्यार्थ्यांना करियरच्या खूप मोठ्या संधी आहेत. त्यामुळेच शेतीसारख्या अर्थव्यवस्थेला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेचा कस या क्षेत्रातही लावून व्यवसायाच्या नवीन वाटा निर्माण केल्या पाहिजे.
- प्रा. राजेराम घावटे, ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी, शिरूर.

शेती, त्यापुढील आव्हाने व त्यातील व्यवसायाच्या संधी या तिन्हीही गोष्टी आज प्रत्यक्षात बांधावर जाऊन अनुभवता आल्या. त्यामुळे करिअरसाठी शेती हा सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांसाठी प्रमुख पर्याय ठरणार आहे.
- श्रेयस घावटे, विद्यार्थी, ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी.

निमोणे (ता. शिरूर) ः प्रसिद्ध द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश काळे यांच्या शेतात शेती व्यवस्थापनाचे धडे घेताना ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या क्रॉप सायन्सचे विद्यार्थी.