
''कळमोडी''चा अहवाल सादर करण्याचे आदेश
शिक्रापूर, ता. २४ : कळमोडी उपसा योजनेतून खेड तालुक्यातील कनेरसर, पूर, वरूडे व वाफगाव आणि शिरूरमधील पाबळ व केंदूर ही दोन गावे जोडण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाला आदेश दिले आहेत. तसे, पत्र कळमोडी पाणलोट विकास संस्थेला नुकतेच प्राप्त झाले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी दिली.
कळमोडी उपसा योजनेच्या मूळ क्षेत्रात वाढीव क्षेत्र जोडण्याबाबतचा निर्णय सन २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला होता. त्यानुसार सर्वेक्षणही झाले होते. योजनेत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील १६२५ हेक्टर व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील ३४४० हेक्टर, असे एकूण ५०६५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. केंदूर, पाबळ, कनेरसर व वाफगाव हा भाग नेहमीच अवर्षणग्रस्त असल्याने योजनेत तो समाविष्ट करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या गावांची आहे. जानेवारी २०१९ मध्ये वाढीव २००० हेक्टर क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेशही तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी दिले होते. त्यानंतर शासनाने वाढीव क्षेत्र वगळले. सद्यःस्थितीत योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात असून, नाशिक येथील तांत्रिक सल्लागार समितीकडे ती प्रलंबित असल्याची माहिती जलसंपदा खात्याचे उपसचिव प्रसाद नार्वेकर यांनी दिल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.