
गुनाटला आडसाली ऊस लागवडीला वेग
गुनाट, ता. २१ : गुनाट, निमोणे, चव्हाणवाडी (ता. शिरूर) या परिसरात सध्या आडसाली ऊस लागवडीला वेग आला आहे. चासकमानचे पाणी नुकतेच या भागांत येऊन गेल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याने येथील शेतकरी आडसाली ऊस लागवडीला प्राधान्य देताना दिसत आहे.
चासकमानच्या पाण्यामुळे या भागातील तळी, तलाव चांगल्यापैकी भरल्याने विहिरी व विंधनविहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला मोर्चा आडसाली ऊस लागवडीकडे वळवला आहे. साधारणपणे ८६०३२ या वाणाला शेतकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. ऊस लागवडीसाठी शेतकरी बियाणे प्रक्रिया, बेसल डोस टाकणे यासारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहे. तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखाना, व्यंकटेश कृपा, व पराग अॅग्रो अशा तीन साखर कारखान्यांमुळे ऊसतोडीसाठी हक्काची बाजारपेठ असल्यानेच शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. दरम्यान, पुरेसा पावसाअभावी जमिनीत ओलावाच नसल्याने मुग आणि बाजरीच्या पेरण्या रखडल्या आहेत.
उसासाठी महागडे बियाणे आणणे, औषधे व खतांच्या वाढलेल्या किमती, कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे ऊस लागवडीच्या खर्चातही वाढ झाली आहे. मात्र बेभरवशाच्या बाजारभावामुळे इतर पिकांच्या मानाने उसाचे हक्काचे दोन पैसे होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यासाठी ऊस पिकाशिवाय पर्याय नाही.
- प्रवीण गोबरे, ऊस उत्पादक शेतकरी, गुनाट
72516
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m82108 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..