
यवतला पालखी मुक्कामाची जय्यत तयारी
यवत, ता. २३ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम यवत येथे असतो. ता. २५ रोजी पालखी सोहळा यवत मुक्कामी येत आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाने सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. दोन वर्षांनंतर हा आनंद सोहळा मुक्कामी येत असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
सोहळ्याच्या स्वागतासाठी रस्त्याची (सेवामार्गाची) डागडुजी, ठिकठिकाणी स्वागत कमानी, वारकऱ्यांच्या अंघोळीसाठी पाचशेहून अधिक नळ व शॉवरची व्यवस्था, वीज प्रवाह खंडित होऊ नये म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सुरू असलेली लगबग, गावातील पानथळीच्या जागा, पाणी साठणारे खड्डे अशी ठिकाणी मुरूम टाकून तो सपाट करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची सुरू असलेली लगबग, पाणी व हॉटेलचे खाद्यपदार्थ यांपासून बाधा होऊ नये म्हणून आरोग्य विभागाची सुरू असलेली दक्षता मोहीम, छोट्यामोठ्या अपघातांची बाधा येणार नाही म्हणून पोलिस प्रशासनाची सुरू असलेली कारवाई हे चित्र सध्या परिसरामध्ये दिसून येत आहे.
यवत ग्रामपंचायतच्या वतीने इतर नियमीत सुविधांसोबत वारकऱ्यांना अंघोळीसाठी गावात ठिकठिकाणी पाचशेहून अधिक नळ व शॉवरची सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. पालखी तळावर सर्व विभागाचे संबंधित अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील यासाठी सुविधा केंद्राची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच वारकऱ्यांना मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन स्थापन केले जाणार असल्याची माहिती सरपंच समीर दोरगे यांनी दिली. तर यवत पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. त्यात पोलिस मदत केंद्र, निरीक्षण मनोरे, फिरते पोलिस स्टेशन या प्रमुख सुविधा दिल्या जाणार आहेत. ग्रामसुरक्षा दल, पोलिस मित्र व पोलिस अॅकॅडमीचे विद्यार्थी सोहळ्या दरम्यान स्वयंसेवक म्हणून पोलिसांना मदत करणार आहेत. अशी महिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m82842 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..