
इंदापूर नगरपरिषदेच्या घरपट्टीवरील बेकायदेशीर
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे
बुधवारी लाक्षणिक उपोषण
इंदापूर ता.११ : इंदापूर नगरपरिषद हद्दीत घरपट्टी आकारणीवर असलेली शास्ती व दंड, तसेच २०१७ पासून थकीत पट्टीवर लावलेला २४ टक्के व्याजाची वसूली बेकायदेशीर व सदोष आहे. याबाबत इंदापूर नागरी संघर्ष समितीने गेल्या ६ वर्षात अनेकवेळा निवेदने दिली मात्र फक्त तोंडी आश्वासने दिली जात आहेत. त्यांचे पालन केले जात नाही यावर ठोस कार्यवाही व्हावी.तसेच कोविड काळातील कर माफ केले जावेत या मागणीसाठी बुधवारी (ता. १५) इंदापूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने घर, व्यापारी गाळे मालमत्ताकर धारक यांना नोटीसा देऊन सक्तीची वसूली करण्यात येत आहे. मालमत्ता धारकांवर मानसिक दडपण आणून मालमत्ता धारकांच्या इच्छेविरूध्द दंड वसूली, व्याज वसूली, पाणीपट्टीवरील व्याज वसूली करण्याचा प्रयत्न केला जात आहे.असा आरोप करीत या सावकारी वसुलीस यावेळी विरोध दर्शवण्यात आला.
तसेच २०१७-१८ पासून लावलेली व्याज आकारणी, शास्ती बेकायदेशीर आहे. म्हणून व्याज आकारणी, दंड आकारणी, शास्ती आकारणी तातडीने रद्द करावी. थकीत घरपट्टीवर जे २४ टक्के व्याज आणि त्यावरती चक्रवाढव्याज आकारत आहात, हे सावकारी असून सुप्रिम कोर्टाने दिलेल्या अनेक निर्णयांच्या विरुद्ध ही बाब आहे. म्हणून ही आकारणी बेकायदेशीर असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
तसेच इंदापूर नगरपालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांची विविध कारणांवरून पिळवणूक होत आहे. गाळाधारक भाडेकरूंची कोरोना काळातील गाळा भाडे रद्द करण्याची मागणीवरही यावेळी चर्चा झाली. याकडे प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरले.यावेळी प्रा. कृष्णा ताटे,ॲड.गिरीश शहा, विठ्ठल ननवरे, शेखर पाटील, धनंजय पाटील, अँड.गिरिष शहा, विठ्ठल ननवरे, महादेव सोमवंशी,राजेंद्र हजारे, दादासाहेब सोनवणे,सलिम बागवान,अविनाश कोथमीरे,सागर गानबोटे, महादेव कांबळे, अहमदराजा सय्यद, वसीम बागवान,हमीद आत्तार,अशोक पवार, आस्वाद जौजाळ, यांचेसह मालमत्ताधारक, गाळेधारक व्यापारी उपस्थित होते.
-
नगरपालिका सावकार नाही
नगरपालिकेने सन २०१७ पासून थकीत घरपट्टीवर २४ टक्के व्याज आकारणी चालू केली असून ही आकारणी कायद्याला धरून नाही नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून सावकार नाही यामुळे या व्याजाकारणीला शहरवासीयांचा तीव्र विरोध आहे नगरपालिकेला उत्पन्न मिळालं पाहिजे हे मान्य आहे यासाठी त्यांनी फक्त थकीत कर घ्यावा व्याज अकारू नये आणि त्यांनी व्याज भरणे बंधनकारक केले तर नाईलाजास्तव मुद्दल पण भरली जाणार नाही असा निर्णय घ्यावा लागेल.
प्रा.कृष्णा ताटे