
आईचा खून करून रचला आत्महत्या केल्याचा बनवा
उरुळी कांचन, ता. १८ : मुलगा अभ्यासाकडे लक्ष न देता फक्त मोबाईल पाहत असल्याने आई रागवल्यामुळे मुलाने आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून केला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे जय मल्हार रोड परिसरात बुधवारी (ता. १५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तस्लिम जमीर शेख (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी झिशान जमीर शेख (वय १८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे जय मल्हार रस्ता परिसरात तस्लिम जमीर शेख या पती व एका मुलासोबत राहत होत्या. त्यांनी बुधवारी (ता. १५) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला होता. तेव्हा तस्लिम यांचा गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
या प्रकरणी अधिक चौकशी केली असता फक्त मुलगा झिशान शेख हाच त्यावेळी घरात असल्याची माहिती समोर आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोबाईलवर पाहात असताना आई रागावली व गालावर चापट मारली. त्यामुळे त्याने आईला जोरात भिंतीवर ढकलले व तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला. आई निपचित पडल्याचे पाहून तो घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. परंतु, मृत्यू झाला असल्याने त्यातून रक्त आले नाही. त्यानंतर त्याने वायर फॅनला अडकविली व मृतदेह खाली उतरून ठेऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला.