
युवकांच्या हाताला काम देणारे बारामतीचे सचिन कुलकर्णी!
युवकांच्या हाताला काम देणारे
बारामतीचे सचिन कुलकर्णी!
ग्रामीण भागातून शिक्षण झाले किंवा त्या परिसरातून असलो, तर फार पुढे जाता येत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण, अनेक जिद्दी युवक आपल्या परिश्रमांच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. छोट्या गावातील युवकही काहीतरी करून दाखवू शकतो, हे सिद्ध करून दाखवितात. बारामतीतील सचिन कुलकर्णी हेही असेच एक व्यक्तिमत्त्व. त्यांनी निरनिराळ्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो युवकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे.
...
बारामतीत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सचिन कुलकर्णी हे पुण्यात संगणकविषयक उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. बारामतीकरांसाठी पुण्यातील हक्काची जागा असलेल्या ‘बारामती होस्टेल’ला वास्तव्य केले. खरंतर ‘बारामती होस्टेल’चे हे वास्तव्यच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला, असं म्हटलं तर वावग ठरु नये. बी.एस्सी.ची पदवी प्राप्त केल्यानंतर व्यवसायात भरारी घ्यावी, अशी त्यांच्या मनाची तयारी ‘बारामती होस्टेल’मध्ये झाली आणि त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले.
स्वतःच्या उद्योगाला सुरवात
शरदचंद्रजी पवारसाहेब व अजितदादा पवार यांनी बारामतीचा जो सर्वांगिण विकास केला, त्याचाच फायदा इतर बारामतीकरांप्रमाणेच सचिन कुलकर्णी यांनाही मिळाला. बारामतीत ‘एमआयडीसी’ची वाटचाल वेगाने सुरु होती. तेव्हा, कंपन्यांचीही घौडदौड सुरु होती. अशा कंपन्यांना कॉम्प्युटर स्टेशनरी पुरविण्याचे काम त्यांनी सुरु केले. या काळात कंपन्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांना कशा पद्धतीची सेवा अपेक्षित असते, याचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला. साधारणपणे सन २००१ पासून त्यांनी पॅकिंग मटेरिअल सप्लायचे काम सुरु केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
पॅकिंग एक्स्पोर्टमध्येही यश
बारामतीतील नामांकित कंपन्यांना पॅकिंग मटेरिअल सप्लाय करतानाच त्यांनी पॅकिंग एक्स्पोर्टमध्ये नशीब अजमावण्याचे ठरविले आणि त्यातही त्यांना कमालीचे यश मिळत गेले. एअर लॉजिस्टीकमध्ये त्यांनी काम सुरु केले आणि परदेशात क्लिअरिंगचे काम त्यांनी मिळवून त्यात यश प्राप्त केले. मुंबईतून आज त्यांचे काम वेगाने सुरु आहे. व्यवसायाच्या निमित्ताने दुबई, युरोप, सिंगापूरसह अनेक देशांची भ्रमंती सुरु असते.
युवकांना मिळवून दिला रोजगार
स्वतःचा व्यवसाय वृद्धींगत करताना आज त्यांनी बारामती पंचक्रोशीतील तब्बल ४५० युवकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. या कुटुंबाला महिन्याला किमान ७० लाख रुपयांचे वाटप पगाराच्या माध्यमातून केले जाते. स्थानिक युवकांनाच नोकरी देण्याचा कटाक्ष त्यांनी सुरवातीपासूनच जपला आहे. सामाजिक बांधिलकीचेच दर्शन यातून घडते. कोविडच्या सुरवातीच्या काळात पाचशे गरजूंना सलग दोन महिने संध्याकाळी जेवण देण्याचेही काम त्यांनी केले. नगरपालिकेच्या आवाहनानंतर स्वखर्चाने खरेदी केलेली मोठी झाडे त्यांनी वृक्षारोपणासाठी देऊ केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही त्यांच्या या कामाचे कौतुक केले.
व्यावसायिक यशाच्या शिखरावर
सचिन कुलकर्णी हा ग्रामीण भागातून आलेला युवक शेकडो युवकांच्या हाताला काम देत आहे. एका सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला आणि बारामतीतच शिक्षण झालेला हा युवक आज व्यावसायिक यशाच्या शिखरावर आहे. युवकांना प्रेरणा देणारा सचिन कुलकर्णी यांचा हा प्रवास आहे. विशेष म्हणजे, यश मिळूनही ते डोक्यात न जाऊ देता त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते आणि आजही आहेत. हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.