महिला दिन पुरवणी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन पुरवणी लेख
महिला दिन पुरवणी लेख

महिला दिन पुरवणी लेख

sakal_logo
By

स्वतःसाठीही जगायला शिका

स्वतःचे अस्तित्व जपूया. त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करा. कारण स्वतःवर प्रेम केले की जग ही आपल्यावर प्रेम करू लागेल. काही दिवसापूर्वी एक सूंदर सुविचार वाचनात आला. ‘इतरांच्या गुणाची कदर करायला हवी पण त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा धरू नका किंवा स्वतःला कमी लेखू नका’. अगदी खरं आहे. दुसऱ्याचा हेवा करण्यापेक्षा स्वतःला जाणा आणि स्वतःवर प्रेम करा. आपण केलेल्या चांगल्या कामासाठी स्वतःचे कौतुक करा. दुसरं कोणी तुमची प्रशंसा करेल, तुमच्या कामाबद्दल शाबासकी देईल, याची वाट बघत बसू नका. स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. स्वतःचा स्वतःच्या कामाचा सन्मान करायला शिका.
- राजश्री बिनायकीया

दि वसातला काही वेळ किमान अर्धातास तरी स्वतःसाठी रिकामा ठेवा. त्या वेळात शांत बसून रहा किंवा आपल्या आवडत्या गोष्टी करा. आवडत नसलेल्या गोष्टी, काम कायम करण्यात काही अर्थ नाही. स्वतःमधील अंगभूत गुण, आपली आवड, अंगभूत कला कौशल्य जाणून घ्या. उदा. संगीत, वादन, गायन, चित्रकला, पाककला, खेळ, लेखन, नृत्य इत्यादी. त्याचा मनापासून जिद्दीनं अभ्यास करा. त्यामधून स्वतःचा व्यवसाय ही आपण निर्माण करू शकतो, आपण स्वतः खास आहोत, याची स्वतःला जाणीव करून द्या. त्याच गोष्टी करा ज्या मधून स्वतःला आनंद मिळेल, समाधान मिळेल. तुमच्यातील कला खुलेल व त्यामुळे तुम्ही स्वतः बहराल. दिवसभराचा बारा-चौदा तासाचा वेळ आणि उठल्यापासून डोळ्यासमोर असलेली कामे यांची सांगड घालता घालता आपण काळाच्या मागे धावतो, कधीतरी कुठतरी थांबावसं वाटतं पण ते शक्य होत नाही. उलट अशा वेळेस कामाचा ताण वाढतो, या सर्व धावपळीत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. आरोग्य चांगलं राहावे यासाठी स्वतःला जपा. वेळोवेळी हेल्थ चेकअप करा, वर्षातून एकदा पंचकर्म करा, ध्यानधारणा करा, व्यायाम करा, स्वतःसाठी, आरोग्यासाठी वेळ काढा. लहान वयात आपण व मैत्रिणी मोकळेपणाने भेटायचो, बोलायचो, फिरायचो, चेष्टा मस्करी करायचो, त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असायची, पण काळानुसार सगळे मागे पडत गेले. वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या वाढल्या. त्यातूनच जुन्या मित्र-मैत्रिणीचा नव्याने शोध घ्या, गाठी भेटी ठरवा. त्यांच्याबरोबर सहलीचे नियोजन करा. गेट टूगेदरच्या निमित्ताने एकत्र या, ताणतणाव विसरून एन्जॉय करा .गप्पा टप्पा, मस्ती करा. तसेच कुटुंबासोबत, आप्तस्वकीयासोबत खास वेळ राखून एन्जॉय करा. सुटीच्या दिवशी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच एक नवीन ऊर्जा व उत्साह मिळेल. एखादी गोष्ट शिकण्यासाठी कुठलेही वय नसते. आयुष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा नवीन काही शिकून घ्या. त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळेल. छोट्या छोट्या गोष्टींतून आपण आनंद मिळवू शकतो. आनंद मनात उतरला की चेहऱ्यातून दिसेल आणि आपलं जगणं ही अधिक सुंदर होईल.