
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा साडेतेवीशसे कोटींचे पीककर्ज
शेतकऱ्यांना यंदा
तेवीसशे कोटींचे पीककर्ज
१६८ कोटींची वाढ : तीन लाख शेतकऱ्यांना फायदा
पुणे, ता. १३ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मिळून वर्षभरात दोन हजार तीनशे ३५ कोटी ९६ लाख ९३ हजार रुपयांचे (सुमारे साडेतेवीसशे कोटी) पीककर्ज वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाच्या रक्कमेत एकूण १६८ कोटी ५६ लाख ९९ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या पीककर्जाचा पुणे जिल्ह्यातील तीन लाख १ हजार ६२७ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपात खरीप हंगामातील पिकांसाठीच्या एक हजार ८४३ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपयांच्या तर, रब्बी हंगामातील पिकांसाठीच्या ४९२ कोटी ३० लाख ३४ हजार रुपयांच्या पीककर्जाचा समावेश आहे. खरीप पीककर्जाच्या रकमेत ११९ कोटी ३१ लाख ७५ हजार तर, रब्बीच्या पीक कर्जात ४९ कोटी २५ लाख २४ हजार रुपायांची वाढ झाली असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी एक हजार ७२४ कोटी ३४ लाख ८४ हजार आणि रब्बी हंगामात ४४३ कोटी पाच लाख १० हजार रुपये, असे एकूण दोन हजार १६७ कोटी ३९ लाख ९४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. पीककर्ज वाटपाचे हे प्रमाण गेल्यावर्षी ९१.८४ टक्के होते. यंदा ते ९७.३३ टक्के इतके झाले आहे. कर्ज वाटपाच्या टक्केवारीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५.४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जिल्हा बॅंकेने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपयांच्या वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात १ हजार ८४३ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. खरिपातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण १०२.३३ टक्के इतके झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी ५९८ कोटी ३५ लाख रुपयांच्या वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ४९२ कोटी ३० लाख ३४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण ८२.२८ टक्के इतके आहे.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बॅंक
साडेदहा हजार कर्जदार वाढले
गेल्या वर्षभरात मिळून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण तीन लाख १ हजार ६२७ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून दोन लाख ९१ हजार पाच शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले. या दोन्ही संख्येची तुलना केल्यास, चालू वर्षात जिल्ह्यात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दहा हजार ६२२ ने वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
30419