
महिलांनी जाणून घेतले फासेपारधी, कातकरी मुलांसाठींचे कार्य
पिंपरी, ता. १५ ः निगडी,प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाने फासेपारधी व कातकरी समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे कार्य जाणून घेतले. यात चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पुनम गुजर व प्राधिकरणातील प्रदीप्त भारत फौंडेशनच्या कार्यकारी संचालक अंजली घारपुरे यांनी माहिती दिली. यासाठी आयोजित कार्यक्रमाला ८५ महिला उपस्थित होत्या.
गुजर यांनी पारधी समाजातील समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे अनेक वर्षांपासून चाललेले प्रयत्न आणि त्यांच्या समोरची आव्हाने सांगितली. तसेच गुरुकुल पद्धतीने मुलांना दिले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण, पहाटे चार ते रात्री अकरापर्यंतची त्यांची दिनचर्या, मुलांमध्ये हळू हळू होणारे बदल याविषयी माहिती दिली. या मुलांच्या नंतरच्या पिढीला हीच मुले आपसूकच सुसंस्कृत नागरिक बनविण्याचा प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
घारपुरे यांनी कातकरी समाजातील समस्या, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी केलेले प्रयत्न, येणाऱ्या अडचणी, केलेली मात याविषयी माहिती दिली. या मुलांमधील उपजत कला-कौशल्य व ती वृद्धिंगत होण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी सांगितले.
मंडळाच्या अध्यक्षा नेहा साठे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय शुभांगी कवडे व वीणा महाजन यांनी करून दिला. कार्याध्यक्षा अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार केला. सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन केले. मीनल भावे यांनी आभार मानले.