‘झेडपी’च्या शाळांतील पोरं हुश्‍शार!

‘झेडपी’च्या शाळांतील पोरं हुश्‍शार!

पुणे, ता. १५ : निपुण भारत गुणवत्तावृद्धी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सरासरी आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (डाएट) केलेल्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय या कार्यक्रमाचा शाळा आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासही फायदा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत गुणवत्तावृद्धी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाची १९ डिसेंबर २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२३ या आठ आठवड्यांच्या कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी भाषा व गणित विषयांसाठी स्वतंत्र असा गुणवत्तासुधार कृती कार्यक्रम निश्‍चित केला होता.

अशी केली तपासणी
या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली की नाही, झाली असल्यास किती झाली आणि झाली नसल्यास, त्याची कारणे काय, याचा शोध घेण्यासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी विद्यार्थ्यांची तीन स्तरात विभागणी केली. यानुसार पहिल्या स्तरात निपुण भारत गुणवत्तावृद्धी कार्यक्रमांतर्गत निश्‍चित करून देण्यात आलेला किमान स्तर हा पाया ग्राह्य धरून गुणवत्तावाढीची टक्केवारी निश्‍चित केली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमधील आठ टक्के विद्यार्थी हे किमान स्तराच्या पुढे असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

गुणवत्तावृद्धी कार्यक्रम दृष्टीक्षेपात
जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या- ३६९०
‘निपुण भारत’ची अंमलबजावणी केलेल्या शाळा- ३६९०
गुणवत्ता सुधारणा पडताळणीसाठी सर्वेक्षण केलेल्या शाळा- ३४८९
गुणवत्ता पडताळणी केलेले वर्ग- इयत्ता दुसरी ते पाचवी
या अभियानात सहभागी झालेले एकूण विद्यार्थी- १,४७,५४६
गुणवत्ता सुधारणेत वाढ झालेले विद्यार्थी- ११,८०४
गुणवत्ता पडताळणी केलेले विषय- भाषा व गणित

शाळांची संख्या व गुणवत्ता वाढीची टक्केवारी
आंबेगाव --- २०८ --- ५.०७ टक्के
बारामती --- २६३ --- ६.१५ टक्के
भोर --- २६९ --- ८.०८ टक्के
दौंड --- २८७ --- ५.३७ टक्के
हवेली --- २१३ --- ९.५४ टक्के
इंदापूर --- ३६५ --- ८.९७ टक्के
जुन्नर --- ३४२ --- ५.४४ टक्के
खेड --- ३६१ --- ११.२६ टक्के
मावळ --- २७५ --- ७.३३ टक्के
मुळशी --- २०७ --- ७.१३ टक्के
पुरंदर --- २१९ --- ११.३९ टक्के
शिरूर --- ३४९ --- ६.०८ टक्के
वेल्हे --- १३१ --- ६,२४ टक्के

जिल्हा एकूण --- ३४८९ --- ८ टक्के

पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या निपुण भारत गुणवत्तावृद्धी कार्यक्रमाचा शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी चांगला फायदा झाला आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीनंतर किमान गुणवत्तेसाठी निश्‍चित करून देण्यात आलेल्या किमान पायाभूत उद्दिष्टाच्या तुलनेत गुणवत्तेत किती सुधारणा झाली, याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात आठ टक्के विद्यार्थ्यांची गुणवत्तेत वाढ
झाल्याचे दिसून आले आहे.
- डॉ. शोभा खंदारे, प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com