
दापोडे ते वेल्हे ‘पर्यावरण वारी’
वेल्हे, ता. १८ : जागतिक महिला दिनानिमित्त दापोडे ते वेल्हे अशी ‘पर्यावरण वारी’ काढण्यात आली. या वारीत ६६ गावांचे प्रतिनिधित्व होते. या वारीमध्ये ५५० महिला, १५० मुले आणि मुली आणि ५० पुरुषांनी सहभाग घेतला होता. यात ६ वर्षांपासून ते ७२ वर्षांच्या आजी बाईंनी देखील सहभाग घेतल्याची माहिती ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या सुवर्णा गोखले यांनी दिली.
या वारीत बीज संकलन, संकलित माहितीचे बॅनर करून लावले होते. त्या शिवाय लहान मुलांची पर्यावरणावर पथनाट्ये, गाणी झाली. पर्यावरणपूरक जगणाऱ्या पौर्णिमा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि पर्यावरण अभ्यासक अमृता जोगळेकर यांचे मार्गदर्शन झाले. कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी ‘मिलेट वर्षा’ची माहिती दिली.
स्वाधार या प्रकल्पाच्या ‘१८ गाव मावळ’ या प्रकल्पाच्या यु ट्युब चॅनेलचे प्रकाशन झाले. यासाठी कोफोर्ज कंपनीतून ५ जणांची टीमने माहिती दिली. हरित ऊर्जा शेती प्रकल्पातल्या महिला नेपियर घेऊनच सहभागी झाल्या होत्या, तर घिसरचा गट पानाफुलांनी नटून करवंदांच्या माळा घालून आला होता. कातकरी आणि मावळातल्या महिला गाण्यात रमून गेल्या होत्या. नवनगर निगडीच्या विद्यालयाने १२ विद्यार्थिनी प्रतिनिधी पाठवल्या होत्या.
VEL23B01695