भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : चिंचवड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ५९) यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी (ता. ३) सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी साडेसहाला शासकीय इतमामात पिंपळे गुरव येथे अंत्यसंस्कार झाले. गेली ३५ वर्षे ते पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात होते. त्यांची स्थानिक राजकारण व प्रशासनावर प्रचंड हुकमत होती. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख होती. २०१७ मधील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणली.

अनेक दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर काही दिवस परदेशात उपचार केले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर श्‍वसनाचा पुन्हा त्रास होवू लागला. सप्टेंबरमध्ये लागल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगताप दोन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. काही दिवसांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले आले. ते त्यातून बाहेर येतील अशी आशा सर्वांना वाटली होती. मात्र, नंतरच्या काळात त्यांची तब्येत अधिक चिंताजनक होत गेली. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजय जगताप असा परिवार आहे.

निधनाचे वृत्त समजताच शहरभरातून त्यांच्या निवासस्थानी रीघ लागली. प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शिवाय विविध कार्यक्रमही रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे आदींसह विविध खात्यांच्या मंत्र्यांनी अंत्यदर्शन घेतले. महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना नेता हरपल्याने भाजपला हा धक्का बसला आहे.
--
प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी कारकीर्द
पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांचा जन्म झाला. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१८ च्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. पण, हुलकावणी दिली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सरकार स्थापन झाले असते तर, जगताप यांना मंत्रिपद नक्कीच मिळाले असते, अशी आजही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.