महाविकास आघाडीचा बोलबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचा बोलबाला
महाविकास आघाडीचा बोलबाला

महाविकास आघाडीचा बोलबाला

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. नीरा (ता. पुरंदर), मंचर (ता. आंबेगाव) आणि मावळमध्ये महाविकास आघाडीने, बारामतीत राष्ट्रवादीने, इंदापूरमध्ये आघाडीने; तर, दौंड बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजपला निम्म्या-निम्म्या जागांवर विजय मिळाला आहे. पुणे बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलने सत्ता मिळविली आहे.
जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. यापैकी भोर व खेड या दोन बाजार समित्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला, तर सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. उर्वरित जुन्नर बाजार समितीसाठी येत्या रविवारी (ता. ३०) मतदान होणार आहे.
निकाल जाहीर झालेल्या नऊपैकी बारामती व खेड या दोन बाजार समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. कॉंग्रेसने भोरमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना भोपळाही फोडता आलेली नाही. दौंडमध्ये निवडणूक खूपच चुरशीची झाली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पॅनेलला प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर यश मिळाले.
तब्बल दोन दशकांच्या खंडानंतर झालेल्या पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलने सत्ता मिळविली. या बाजार समितीवर गेल्या २० वर्षांपासून प्रशासकराज होते. त्यामुळे दोन दशकांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच या बाजार समितीची निवडणूक झाली. यामध्ये १८ पैकी १३ जागांवर भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाच्या संयुक्त पॅनेलने विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तीन जागांवर अन्य उमेदवार विजयी झाले.