मळद येथे बसच्या धडकेत मोटारीतील दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळद येथे बसच्या धडकेत
मोटारीतील दोघांचा मृत्यू
मळद येथे बसच्या धडकेत मोटारीतील दोघांचा मृत्यू

मळद येथे बसच्या धडकेत मोटारीतील दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २४ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे खासगी आराम बस व स्विफ्ट डिझायर मोटारीचा अपघात होऊन स्विफ्ट दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या बोगद्यात पाण्यात पडल्याने दोन जण जागीच ठार झाले.
पुण्याहून बुधवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर मोटारीतून (क्र. एमएच १४ डीटी ८३६३) उदगीरकडे पुणे- सोलापूर महामार्गावरून जात असताना मळद हद्दीत खासगी आराम बसचा (क्र. एनएल ०१ बी २००४) अपघात झाला. बसने स्विफ्टला डॅश दिल्याने वेगात असणारी स्विफ्ट चालकाचा ताबा सुटल्याने दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या पाण्यात कोसळली.
या अपघातात स्विफ्टमधील बलवंत विश्वनाथ तेलंगे (वय ३५, सध्या रा. भोसरी, पुणे; मूळ रा. सोमनाथपूर, ता. उदगीर, जि. लातूर) व नामदेव जिवन वाघमारे (वय १८, रा. भोसरी) या दोघांचा मृत्यू झाला. ते एकमेकांचे दाजी-मेव्हणे होते. हे दोघे पुण्याहून गावाकडे चालले होते. अपघात पहाटे दीडला घडूनही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता व मृतांची नावेही पोलिसांना निष्पन्न झाली नव्हती.