दंडात वाढ होवूनही वाहनचालक बेशिस्त

दंडात वाढ होवूनही वाहनचालक बेशिस्त

पिंपरी, ता. २९ : दंड रकमेत मोठी वाढ होवूनही वाहनचालकांकडून शिस्तपालन होत नसल्याचे कारवाई मोहिमेतून दिसत आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरात १७३८ चालक व मालक विनापरवाना सापडले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारला आहे.

राज्यातील ३० टक्के अपघात कमी करण्याबाबत परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेश देत ठोस उपाययोजना व कारवाया वाढवा, असे आदेश दिले आहेत. परवाना नसताना वाहन चालविल्यास पाच हजार रुपये, तर परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन हाती घेतल्यास चालक व मालक यांना प्रत्येकी ५ हजार अशी एकूण १० हजार रुपये दंडाची तरतूद नवीन कायद्याप्रमाणे आहे. पूर्वी हा दंड पाचशे रुपये होता. वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी केंद्र शासनाने सुधारित दंड जाहीर केले आहेत.

ऑटो रिक्षा चालक-मालक, सर्व माल वाहतूक करणारे, प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक यांनी विनापरवाना, विमा प्रमाणपत्र वैध नसणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण संपलेली वाहने, पीयूसी प्रमाणपत्र नसणे या कलम दंडामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विनापरवाना धारकांकडूनही याच पद्धतीने दंड आकारणी केली जात आहे. त्यामुळे, कागदपत्रांशिवाय वाहन रस्त्यावर आणल्यास मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांचाही यात अधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, त्यांच्याकडे वाहन आढळून आल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

मोटार वाहन १९८८ अंतर्गत येणाऱ्या विविध कलमासाठी दंडात वाढ केलेली आहे. याची अंमलबजावणी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दंडातील दुप्पट, तिप्पट व चौपट आहे. परवाना नसताना वाहन चालवणे, परवाना जवळ न बाळगणे कलमासाठी रुपये पाच हजार, परवानाशिवाय वाहनाचा वापर करणे यासाठी चालक- मालक २० हजार रुपये, अतिभार वाहन चालविणे, त्यासाठी प्रत्येक टनासाठी चालक- मालक ४० हजार दंडाची आकारणी होणार आहे.
--
कोट
गेल्या वर्षभरात सतराशेहून अधिक जणांवर कारवाई केली. नियमित कारवाया सुरु आहेत. दंडातून कोणालाही सवलत नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- राजश्री गुंड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com