पशुधन किसान क्रेडिट कार्ड घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुधन किसान क्रेडिट कार्ड घ्या
पशुधन किसान क्रेडिट कार्ड घ्या

पशुधन किसान क्रेडिट कार्ड घ्या

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ४ : पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी खेळत्या भांडवलासाठी खासगी सावकाराच्या कर्जाला व व्याजाला बळी न पडता केंद्र पुरस्कृत पशुधन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावेत. बॅंकांकडे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव निकाली काढून सर्वसामान्य पशुपालकांना विनातारण १ लाख ६० हजार रुपये मर्यादेचे पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्ड वितरित करावेत, असे आवाहन मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी केले.

किसान क्रेडिट कार्डसाठी मुळशी तालुक्यातून तब्बल १०३५ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले असून, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेने ही संख्या सर्वाधिक आहे. १५ नोव्हेंबर २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२२ या काळात पशुसंवर्धन विषयक क्रेडिट कार्ड अभियान पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मुळशीमार्फत राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातील १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत १०३५ पशुपालकांचे अर्ज प्राप्त झाले. मात्र, ते बँकेत जमा करूनही तालुक्यातील बँकांचा प्रतिसाद अल्प मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी जठार व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सचिन काळे यांनी मुळशी तालुक्यातील विविध बँकांचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून येणाऱ्या अडचणींबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पशुसंवर्धन विषय किसान क्रेडिट कार्ड हा विषय बँकांसाठीसुद्धा नवीनच आहे. त्यामुळे लवळे शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक संजय नंदकर यांनी तालुक्यातील सर्व बँकर्सला मार्गदर्शन केले. लवळे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात तीन पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन काळे यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील पशुपालक मुख्यत्वे पुणे जिल्हा सहकारी बँकेचा ग्राहक असून, किसान क्रेडिट कार्डसाठीचे बहुतांशी अर्ज हे या बँकेच्या नावे आहेत. परंतु, बँकेने जी नियमावली जाहीर केली आहे, ती जुनी आहे. त्यात प्रामुख्याने पशुपालक हा दुग्ध संस्थेचा सभासद असावा, त्याने जमीन तारण ठेवलीच पाहिजे, त्याने पशुधनाचा विमा काढला पाहिजे व दुधाचे बिल बँकेत जमा झाले पाहिजे, या अटी जुन्या असून, केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार नियमबाह्य आहेत. त्यात बदल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
- संदीप जठार, गटविकास अधिकारी, मुळशी

PNE22S61894

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00489 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top