
मुळशीतील २२ गावांची टंचाई संपणार
पिरंगुट, ता. ७ : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक दोनसाठी मुळशी धरणातील पाण्याच्या आरक्षणाला टाटा पॅावर कंपनीने मंजुरी द्यावी, याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे मुळशीच्या पूर्व पट्ट्यातील व कोळवण खोऱ्यातील एकूण २२ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता होणार आहे. त्यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी माहिती माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार, सरकारच्या जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुळशी प्रादेशिक पाणी योजना टप्पा क्रमांक २ हा प्रकल्प ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे ३०.१२ दलघमी (१.०६ टीएमसी) इतके पाणी आरक्षणाची कारवाई कंपनीने करावी. याशिवाय जॅकवेल बांधण्यासाठी दहा गुंठे जागा व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५ एकर जागा टाटा पॅावरने उपलब्ध करून द्यावी.
या योजनेसाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे, रवींद्र कंधारे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी व अधीक्षक अभियंता, पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण मंडळाचे अभियंता व टाटा पॅावर कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.
योजनेचा अहवाल सादर करणार
या बैठकीत मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा टप्पा क्रमांक दोनसाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षण करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या पाणी पुरवठा योजनेचे प्रारूप अहवाल तयार करण्याचे काम मे. प्रायमुव्ह कंसल्टंट पुणे यांना दिलेले आहे. त्यांनी हा प्रकल्प अहवाल तयार केला असून, शासनाच्या तांत्रिक छाननी उपसमितीने त्याला ३ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. हा प्रकल्प अहवाल प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे सदर करण्याची कार्यवाही चालू आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00500 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..