
गायरानातील अतिक्रमणाचा फटका
पिरंगुट, ता. १० : गायरानात अतिक्रमण केल्याच्या कारणावरून घोटवडे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ महादू भेगडे यांचे सदस्यत्व रद्द केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सदस्य रद्द केल्याचा आदेश काढला असून, यासंदर्भात शेखर अर्जुन भेगडे यांनी तक्रार दाखल केली होती.
घोटवडे येथील गट नं.३१८ या सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीररीत्या घर बांधण्यात येऊन त्याची ग्रामपंचायत दफ्तरी ८अ उताऱ्यावर नोंद केली आहे. या उताऱ्यावर मालक म्हणून ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव असून, भोगवटादार म्हणून ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे यांच्या पत्नी सारिका यांच्या नावाची नोंद आहे. २५ बाय २०, अशा एकूण ५०० चौरस फुटाचे पत्राशेड व २५ बाय २४, असे एकूण ६०० फूट शौचालयासह असे या नोंदीत मिळकतीचे वर्णन आहे. त्यानुसार त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावा, असा अर्ज शेखर भेगडे यांनी केला होता. छाननी केली असता अतिक्रमण झाल्याचे दिसून आल्याने नवनाथ भेगडे यांचे सदस्यत्व रद्द केले. ॲड. अमित आव्हाड व ॲड. सोपान मुंडे यांनी अर्जदार शेखर भेगडे यांच्यातर्फे युक्तिवाद केला होता.
अपील करणार : नवनाथ भेगडे
याबाबत नवनाथ भेगडे यांनी सांगितले की, आमच्या वडिलोपार्जित जमीन मिळकत क्र. ३२५ चे अद्याप वाटप झालेले नसून, राजाराम रघुनाथ भेगडे व इतर चार जणांत तेथील वहिवाट आहे. या जमिनीवरील गुरांसाठी लोखंडी पत्रा शेडची नोंद न करता ग्रामपंचायतीने बेकायदेशीररीत्या पत्नीच्या नावे चुकीची नोंद केली. जोपर्यंत सामाईक वहिवाटीची हद्द निश्चित होत नाही, तोपर्यंत कोणतीही नोंद करू नये व ही चुकीची नोंद रद्द करावी म्हणून मी ग्रामपंचायतीला लेखी अर्ज दिला होता. मी सरकारी गायरान जमीन गट क्र.३१८ मध्ये कुठलेही अतिक्रमण केले नाही. त्यामुळे त्या नोंदीशी व मिळकतीशी आमचा काहीएक संबंध नसल्याचा व मिळकत क्र.५/३६३ ही चुकीची नोंद रद्द करावी, असेही अर्ज स्वतःच ग्रामपंचायतीला दिला होता. ग्रामपंचायतीने केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे लागलेला हा निकाल असून, त्याविरोधात मी अपील करणार आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00511 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..