पत्नीचा घातक औषधे देऊन खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीचा घातक औषधे देऊन खून
पत्नीचा घातक औषधे देऊन खून

पत्नीचा घातक औषधे देऊन खून

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २२ : प्रेयशीसोबतच्या लग्नात अडथळा नको म्हणून पहिल्या पत्नीला घातक औषधे देऊन खून केल्याची धक्कादायक घटना पाच महिन्यांनतर उघडकीस आली. पत्नीच्या आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या या आरोपीस पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्वप्नील बिभीषण सावंत (वय २३, रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड), असे त्याचे नाव आहे. तो कासार आंबोली (ता. मुळशी) येथील घोटावडे फाट्यावरील श्रद्धा हॅास्पीटलमधील आयसीयू वॅार्डमधील परिचारक म्हणून काम करत आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रद्धा हॉस्पिटल’मध्ये आयसीयू वॉर्डमध्ये स्वप्नील सावंत हा परिचारक म्हणून कामाला होता. पाच महिन्यांपूर्वी प्रियांका क्षेत्रे (वय २२) हिच्याशी प्रेमविवाह करून तो कासार आंबोलीतील अशोक लक्ष्मण बलकवडे यांच्या खोलीत भाड्याने राहण्यास आला होता. या कालावधीत त्याचे हॅास्पीटलमधील परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीशी (रा. उत्तरप्रदेश) त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्याला तिच्याशी दुसरे लग्न करावयाचे होते. त्यामुळे त्याने पत्नी प्रियांका क्षेत्रे हिला घातक औषधे देऊन तिचा खून केला. त्यानंतर तिला श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचाराचे नाटक करून तेथील हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून ती मयत झाल्याबाबत पोलिसांत कळविले.
मात्र, तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यात स्वप्नील याने मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला असता स्वप्नील याने पत्नी प्रियांका हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी त्याने प्रियांका हिला श्रद्धा हॉस्पिटलमधील आयसीयूमधून घातक औषधे गुपचूप घरी आणली व तिचा खून केला.
याबाबत पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे पुढील तपास करीत आहेत.