टेमघर धरण परिसरात अतिक्रमणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेमघर धरण परिसरात अतिक्रमणे
टेमघर धरण परिसरात अतिक्रमणे

टेमघर धरण परिसरात अतिक्रमणे

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २७ : टेमघर (ता. मुळशी) धरणासाठी संपादित केलेल्या बुडीत क्षेत्रालगत अतिक्रमण करून काही धनदांडग्यांनी अनधिकृत रस्ता व बांधकाम केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली.
याबाबत पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, टेमघर प्रकल्पाच्या संपादित जमिनीमध्ये काही व्यक्तींनी अतिक्रमण व भराव करून कायमस्वरूपी रस्ता व बांधकाम करून व्यवसायासाठी व राहण्यासाठी अनधिकृत वापर करायला सुरवात केली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. धरणामध्ये दगड, मुरूम व मातीची भर टाकून मोठे रस्ते बनवले जात आहेत. धरणाला लागून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बांधकाम होत आहे. धरणाच्या पाण्यालगतच्या डोंगराचे व जमिनीचे उत्खनन करून त्याचा भराव धरणाच्या पाण्यात टाकला आहे. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करावी.

टेमघर प्रकल्पाच्या संपादित जमिनीमध्ये काही व्यक्तींनी जलसंपदा विभागाच्या संपादित जागेत अतिक्रमण व भराव करून कायमस्वरूपी रस्ता व बांधकाम करून व्यवसायासाठी व राहण्यासाठी अनधिकृत वापर सुरू केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, या जमिनीमध्ये केलेले अतिक्रमण स्वखर्चाने काढून टाकावे व जलसंपदा विभागाच्या संपादित जागा पूर्व स्थितीत करून द्यावी, अशा स्वरूपाच्या नोटिसा संबंधितांना पाठविलेल्या आहेत. सध्या दहा लोकांनी नोटीस घेतल्या असून, अद्याप उर्वरित सुमारे दहाहून अधिक लोकांना नोटीस देण्याचे काम चालू आहे. त्यानंतर शासकीय नियमानुसार संबंधितांवर कारवाई करणार आहोत.
- एच. जी. जाधव,
उपविभागीय अभियंता, टेमघर उपविभाग क्रमांक २