
भोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र मारणे
पिरंगुट, ता. २९ : भोडे (ता. मुळशी) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र रामभाऊ मारणे हे विजयी झाले.
भोडे व वेडे या दोन गावांची मिळून असलेल्या या ग्रुप ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या सात आहे. यावेळी झालेल्या सदस्यपदांच्या निवडणुकीत तीन जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित चार सदस्यांच्या जागेसाठी झालेल्या मतदानात तानाजी लक्ष्मण नवसकर, सायली कानिफनाथ ढमाले, सारिका लक्ष्मण मारणे व लक्ष्मण कोंडिबा मारणे हे निवडून आले. त्यामध्ये सारिका मारणे व लक्ष्मण मारणे या पती-पत्नीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती स्त्री, अशा तीन सदस्यपदांच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
निवडीनंतर राजेंद्र मारणे व सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रामभाऊ मारणे, एन. डी. मारणे, भाऊसाहेब मारणे, पांडुरंग मारणे, धनंजय मारणे, अमोल मारणे, गणेश मारणे, अनिकेत मारणे, किसन नवले, पोपट मारणे, संतोष भालेराव, साहेबराव मरगळे आदी उपस्थित होते.