मुळशी निसर्गाची पर्यटकांना भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी निसर्गाची पर्यटकांना भुरळ
मुळशी निसर्गाची पर्यटकांना भुरळ

मुळशी निसर्गाची पर्यटकांना भुरळ

sakal_logo
By

मुळशी निसर्गाची पर्यटकांना भुरळ

पावसाचे आगार असलेल्या मुळशी तालुक्यातील ताम्हिणी, भीरा आणि शिरगावला पडलेला पाऊस अनेकदा चेरापुंजीच्या रांगेत जाऊन बसलेला बसलेला आहे. त्यामुळे शेकडो वर्षे बरसलेल्या पावसाने मुळशीतील वनसंपदा समृद्ध केली आणि जैवविविधता भरभराटीस आली. बारमाही हिरव्यागार डोंगररांगा, पावसाळ्यातील पांढरेशुभ्र कोसळणारे धबधबे, विविध ठिकाणचे निळेभोर तलाव, धार्मिक स्थळे, गड, किल्ले, देवराई आणि मनाला भुरळ पाडणारी जैवविविधता यांचा सुरेख संगम मुळशीच्या सौंदर्यात भर घालतो. त्यामुळे तरुणांनी या पर्यटन व्यवसायांत उतरल्यास रोजगारांची मोठी संधी उपलब्ध होईल.

- धोंडिबा कुंभार, पिरंगुट

ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या अभ्यासानुसार, ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व ‘पर्यावरण-स्त्रोत’च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तीर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, त्यातील एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा हे ठिकाण आहे. या बायोहॅाटस्पॅाट मुळशीला पर्यटनासाठी वरदान ठरले. इथल्या पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथला निसर्ग, पशू-पक्षी, धार्मिक स्थळे, शेती, डोंगररांगा, देवराई, पौराणिक संदर्भविषयक स्थळे तसेच किल्ले यांचा बहुआयामी संगम आहे. प्रमुख निसर्गस्थळांचा विचार केल्यास ताम्हिणी, लवासा, ॲम्बी व्हॅली तसेच भोरदेव आणि तव आदी परिसराचा विचार होतो. या परिसरातील जैवविविधता लक्षणीय असल्याने बाराही महिने इथला परिसर सौंदर्याने नटलेला असतो. बाराही महिने मुळशीतील सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्याकंच निसर्गाने बहरल्या असतात.

मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-कोलाड रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती केल्यामुळे कोकणची वाट आता सुखद, आरामदायी आणि आल्हाददायी झाली आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामांचा अपवाद वगळता हा रस्ता मुळशीकरांना वरदान ठरला आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आदरवाडी येथील तांदळीच्या ओहळातील धबधबा-ताम्हिणी गावापासून सुरू झालेले आणि निव्याच्या पुढे गेल्यावर उजवीकडे भांबर्डेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सुसाट वेगाने येणारे धुके, रस्त्याची नागमोडी वळणे, पावसाच्या संततधारेने पाण्याने तुडुंब भरण्याच्या मार्गावर असलेली भातखाचरे आणि थंडगार हवा अनुभवायला मिळते आहे. निव्याच्या पुढील प्लस व्हॅलीचा अनुपम सौंदर्याचा खजिना डोळ्यात साठवीत दुतर्फा असलेल्या दुर्मिळ वनस्पतींनीयुक्त देवराया, गर्द झाडी, गरुड, शेकरू तसेच हॅार्नबिलसारखे पशू-पक्षी, खळाळणारे ओहोळ आणि कातळांना फुटलेला पाझर सुखावून जातो.
डाव्या बाजूने मान वर करायला लावणाऱ्या सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगावरून कधी लपेटून लहान बाळाप्रमाणे हळूवार अंगावर खेळणाऱ्या; तर कधी जोरदार मुसंडी मारून, कधी फटकारून जाणाऱ्या धुक्याच्या लाटा मोहरून जातात. ‘गरूडमाची’ सोडल्यावर आदरवाडीतील तांदळीच्या ओहळातील फेसाळलेला जुळा धबधबा आणि ताम्हीणीचा घाट रस्ता म्हणजे निसर्गाने बहाल केलेला अनुपम सौंदर्याचा खजिनाच. कोकण आणि घाटमाथ्यावरच्या सीमेवरचं हे अनुपम सौंदर्याचं ठिकाण म्हणजे, ताम्हिणी घाट आहे.

निवे गाव सोडले की भांबर्डे गावाकडे जाताना कुंडलिका व्हॅलीचा भाग म्हणजे पिंपरी पॅाईंट लागतो. अंधारबनात इथून जावे लागते. धोकादायक आणि सरळसोट कड्यांचा खजिना म्हणजे पिंपरी पॅाईंट. पावसाळ्यात कोकणातून उन्नयनी धरणातून कुंडलिका व्हॅलीकडे झेपावणारे अंगाला झोंबणारे थेट मारा करणारे धुके आणि पाऊस इथे अनुभवायला मिळतो. भांबर्डे परिसरात नवरानवरीचा डोंगर लक्ष वेधून घेतो. घुटके परिसरातील घटत्कोच आणि हिडिंबाची डोंगररांग आणि बार्पे, आडगावची देवराई म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच. पुढे लोणावळ्याकडे जाताना सालतर परिसर म्हणजे मुळशीच्या शीरपेचातील तुराच म्हणावा लागतो. सहारा, अॅम्बी व्हॅलीही निसर्गाचा खजिनाच आहे.

लवासा परिसरातील धामणओहोळ, बॅाम्बे पॅाईंट, भोरदेव आणि तव म्हणजे अजूनही मानवी हस्तक्षेपापासून काही अंशी शाबूत राहिलेला टापू आहे. म्हणूनच इथली वनश्री भुरळ घालते. मुळशीत देवराईंची
संख्या सुमारे दीडशेच्या आसपास असून, त्यांचा अभ्यास आजपर्यंत अनेक दिग्गज तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यांचाच वारसा आजही काही जाणकार, पर्यावरणप्रेमी पर्यटक या देवरायांना वारंवार भेटी देत आहेत.

टेमघर, वरसगाव आणि मुळशी धरण, हाडशी, वाळेण येथील बंधारे, मुळा, मुठा यांसारख्या वर्षभर वाहणाऱ्या प्रदूषणविरहित नद्या म्हणजे इथल्या जीवनवाहिन्या असून, समृद्धीचे साधन आहे. मुळशी धरण क्षेत्रातले कोराईगड, घनगड, कैलासगड, तैलबैल, भैरवगड आणि कोळवण खोऱ्यातला तिकोना म्हणजे शिवरायांच्या पाऊलखुणाच. अलीकडे मोरगिरी किल्ला उजेडात आला आणि तिथेही गडप्रेमी आणि ट्रेकर्सची रांग लागलेली असते. पळसे येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची रीघ लागते.

रानमेव्याचा खजिना
उन्हाळ्यात करवंद, जांभूळ, आळू, तोरण, अंगुळ, फणस आदी रानमेवा पर्यटकांच्या आवडीचा झाला आहे. निरोगी शरीरासाठी लागणारी सेंद्रिय धान्यसंपदा, आयुर्वेदिक वनस्पतींची मुबलकता, आल्हाददायक ऋतू, प्यायला मिळणारे चवदार पाणी, यामुळेच मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य परिसर आज सर्वांच्या डोळ्यासमोर डोलत आहे.

विविध पर्यटन प्रकल्प
मुळशी धरण भागातील सहारा तसेच ॲम्बी व्हॅलीचा प्रकल्प, मोसे खोऱ्यातील लवासामुळे तालुक्याचे चित्र पालटले आहे. शहरातील हजारो पर्यटक मुळशी, टेमघर, हाडशी धरण परिसरांत तसेच अन्य दुर्गम भागात वर्षा विहाराचा आनंद लुटत आहेत. हाडशीतील साईबाबा मंदिर म्हणजे भक्ती आणि पर्यटनाचा सुरेख संगम आहे. मंदिराच्या पायऱ्यांवरून तिकोना, निळ्याभोर पाण्याचा हाडशीचा बंधारा, भालगुडीच्या मांडवी डोंगराच्या उत्तुंग आणि हिरव्यागार डोंगररांगा, नारायणदेव मंदिर, पश्चिमेकडील वाघजाईचा डोंगर, वाळेणचा बंधारा आदी निसर्ग सौंदर्यस्थळांमुळे साईबाबा मंदिराला आवर्जून भेट देणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची संख्या वाढतेच आहे. सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. खारावडे येथील म्हसोबा देवस्थान तसेच डावजे येथील निळकंठेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.

काहीशी अपरिचित पर्यटन स्थळे
पिरंगुटची इंजाई, माळेगावची खोंदाई, मुठा नदीचा उगम असलेले मांडवखडक, आंधळे खोऱ्यातील उंबराईची देवराई, सावळ्या घाट, सवाष्णिचा घाट, मिल्की रिंग धबधबा आदी अपरिचित व दुर्लक्षित राहिलेली ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहेत. प्लस व्हॅलीच्या पायथ्याला असलेले देवकुंड असेच एक मानवी हस्तक्षेपापासून काहीसे दूर असलेले ठिकाण जिथे जैवविविधतेची खूपच रेलचेल आहे. या देवकुंडाचं गंभीर, निरव आणि अंतर्मुख करायला लावणारं शांततेतलं रुप, शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यासारखा शांत आदळणारा धबधबा, अंगावर कोसळू पाहणारे काळेकुट्ट कडे, थंडगार पाणी, गर्द वृक्षवल्ली पर्यटकांसाठी मेजवानीच ठरते. अलीकडे या ठिकाणांकडेही पर्यटक आकर्षित होत आहेत.