
मुळशी तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
पिरंगुट, ता. २६ : मुळशी तालुक्यात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, स्थानिक ग्रामस्थ, लहान मुले, प्रवासी व वाहनचालकांना त्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा शासकीय अथवा प्रशासकीय पातळीवर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिरंगुट ते पौड दरम्यानच्या परिसरातील हॅाटेलमधील शिल्लक, खरकटे तसेच टाकाऊ अन्नावर ही कुत्री तुटून पडतात. पिरंगुट, दारवली, सुतारवाडी, उरवडे तसेच मुठा आदी घाटरस्त्यात हॅाटेलमधील शिल्लक, शिळे व टाकाऊ अन्न रात्रीच्यावेळी फेकून दिले जाते. तसेच, विविध विविध गावांतील काही घरांच्या कोपऱ्यांवर, रिकाम्या जागांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी काही ग्रामस्थ शिळे अन्न उघड्यावर फेकतात. त्यामुळे या अन्नाच्या शोधात ही भटकी आणि मोकाट कुत्री एकत्र गोळा होतात. टोळी करून या उघड्या अन्नावर तुटून पडतात. त्यामुळे अलीकडे या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. घाट रस्त्यात अनेकदा ही कुत्री वाहनांना आडवी येतात. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढलेले आहे. ही मोकाट कुत्री बऱ्याचदा हिंसक बनल्याने माणसांसह जनावरांवरही हल्ले करतात. अमराळेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी कामगारांना व नागरिकांना या कुत्र्यांचा मोठा त्रास होत आहे.
पिरंगुट येथील वनालिका या गृहनिर्माण संस्थेच्या पूर्वेकडील डोंगर भागात तर या कुत्र्यांचा मोठा अड्डाच झालेला आहे. अनेकदा ही मोकाट कुत्री माणसांवरही हल्ले करू लागलेले आहेत. विविध गावांतील सार्वजनिक रस्त्यावर ही मोकाट आणि भटकी कुत्री टोळीने फिरताना आढळतात. त्यामुळे स्थानिकांना त्याचा मोठा उपद्रव होऊ लागला आहे. रात्रीच्यावेळी माणसांवर भुंकणे, मागे लागणे तसेच प्रसंगी चावा घेणे आदी घटनाही घडू लागल्या आहेत. रात्रीच्यावेळी भर झोपेत असताना ही मोकाट कुत्री जोरजोराने विव्हळत अथवा भुंकत असतात. या कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांना तर भर दिवसाही बाहेर पडणे मुश्कील होऊन बसते.
लवळे, पिरंगुट, नांदे, भरे, उरवडे, आंबेगाव, कासार आंबोली, शिंदेवाडी, सुतारवाडी, अमराळेवाडी, आंबडवेट तसेच अन्य गावांत तसेच परिसरातील या मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.