नाथ म्हस्कोबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाथ म्हस्कोबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी
नाथ म्हस्कोबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी

नाथ म्हस्कोबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २४ : ‘‘यावर्षी चारही खंडात पावसाचे प्रमाण चांगले असेल. गायी गुरांचा आजार हटणार असून मनुष्याच्या पाठीमागे आजाराची पीडा राहील’’, अशी भाकणूक वर्तविण्यात आली. लवळे (ता. मुळशी) येथील राऊतवाडीतील नाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीचा उत्सव साजरा करताना देवाचे सेवेकरी प्रमोद राऊत व तानाजी राऊत यांनी ही भाकणूक वर्तविली.
म्हस्कोबाच्या यात्रेनिमित्त पहाटे देवाला दही दुधाचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिरासमोर गुढी उभारण्यात आली. गेली दोन दिवस मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फुलांच्या माळांनी मंदिर, परिसर तसेच गाभाऱ्यात सजावट केली होती. दुपारी देवाला पोशाख करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी पाचनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. रात्री सात वाजता विद्युत रोषणाई केलेल्या व फुलांच्या आकर्षक सजावटीने तयार केलेल्या पालखीत देवाची मिरवणूक काढण्यात आली. देवाचे मानकरी कळमकर मंडळींचा छबिना व मानाच्या काठ्या राऊतवाडी येथे आल्यावर तेथील राऊत मंडळी आणि कळमकर मंडळींच्या मानाच्या काठ्यांच्या भेटाभेटीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर वाजत गाजत काठ्या व पालखी मंदिरात आणल्या. देवाचे सेवेकरी पंडित राऊत, पिराजी राऊत, मारुती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री दहा वाजता छबिन्याला सुरवात झाली. या वेळी सालकरी, मानकरी, सेवेकरी, दागीणदार देहभान हरपून छबिन्यात सहभागी झाले होते. त्यानंतर देवाची अमृतवाणी हा भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर देवाची पालखी गावठाणातील रोटमलनाथ मंदिरात भेटीसाठी आणण्यात आली. तेथील मंदिरात देवाचे सालकरी अशोक माळवे यांच्या भराडाचा कार्यक्रम पार पडला. उद्योजक नाथाजी राऊत व निवृत्त कृषी अधिकारी आनंदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.