
मुळशी प्रादेशिकचा पाणी पुरवठा बंद
पिरंगुट, ता. १७ : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पिण्याचे पाणी गेले दोन दिवस पूर्ण बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. भर उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नसल्याने मिळेल तिथून पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. अनेकांना टॅंकरच्या पाण्यावर तर काहींना जादा पैसे मोजून बाटलीतील शुद्ध पाणी मिळवावे लागत आहे.
या योजनेतून होणारा पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असतो. त्यामुळे एक दिवस जरी हा पाणी पुरवठा खंडित झाला तर नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी सातत्याने मिळावे. त्यात कोणताही अडथळा येऊ नये, अशी मागणी पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे यांनी केली आहे.
याबाबत या योजनेचे अभियंता दयानंद बिराजदार म्हणाले, ‘‘सध्या अपुरा वीज पुरवठा होत असून, येथील पंपही जुना झालेला असल्याने तो वारंवार बिघडतो. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. उद्या नवीन डीपी बसविल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल. तसेच, येत्या आठवडाभरात नवीन पंपही बसविणार आहोत. त्यामुळे पंधरा दिवसांत पाणी पुरवठा सातत्याने होईल.’’