विनायक ताकवले गुरुंजींना चौदाव्या वर्षीच कारावास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक ताकवले गुरुंजींना
चौदाव्या वर्षीच कारावास!
विनायक ताकवले गुरुंजींना चौदाव्या वर्षीच कारावास!

विनायक ताकवले गुरुंजींना चौदाव्या वर्षीच कारावास!

sakal_logo
By

लोगो- स्मरण स्वातंत्र्यवीरांचे

विनायक ताकवले गुरुंजींना
चौदाव्या वर्षीच कारावास!

पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथील स्वातंत्र्यसैनिक विनायक ताकवले (गुरुजी) यांचा वयाच्या ९८वर्षीही तोच जोश, तीच देशभक्ती, तोच आक्रमकपणा जिवंत आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील आठवणी सांगताना त्यांचे थरथरणारे हात, पाणवलेले डोळे मन थक्क करून ठेवतात.

- संतोष जंगम, परिंचे

‘आरोपीचे नाव विनायक सर्जेराव ताकवले, वय वर्षे १४, कैदी नंबर ३३५, ठिकाण येरवडा कारागृह, अटक झालेली तारीख २४/८/१९४२, सोडलेली तारीख २/४/१९४३, एकूण कारावास ९ महिने, शि‌क्षेचे कारण स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग!’ ही ओळख आहे, पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथील स्वातंत्र्यसैनिक विनायक ताकवले (गुरुजी) यांची. त्यांना बारामती तालुक्यातील पणदरे या मामाच्या गावात प्राथमिक शाळेचे शिक्षण घेत असताना वयाच्या १४व्या वर्षी पारतंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्य म्हणजे काय याचे, ज्ञान मिळाले. कारण, मामा खंडेराव जगताप हे देखील स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली.
दरम्यान, हरगुडे येथील मुळ गावी आल्यानंतर काशिनाथ गुलाबराव ताकवले, बाबूराव गणपत ताकवले, विठ्ठल कृष्णराव ताकवले या स्वातंत्र्यलढ्यासाठी सहभाग घेणाऱ्या तरुणांच्या संगतीत चळवळीत काम करायला सुरवात केली. गावातून प्रभातफेरी काढल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली. वय लहान असल्यामुळे माफीनामा दिल्यास तुरुंगातून सुटका होणार असल्याचे इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, तरीही त्यांनी माफीनामा लिहून दिला नाही. तुरुंगात आठ महिने उलटले, सुटका होण्यासाठी उपोषण सुरू केले. पाच दिवस बिनाअन्नपाण्याचे उपोषण केले. शेवटी इंग्रज अधिकाऱ्यांनी नांगी टाकली आणि तुरुंगातून सुटका झाली.
या आठ महिन्यांच्या कारावासात त्यांचा अनेक स्वातंत्र्यसैनिकांशी संपर्क आला. सन १९४५ मध्ये पुण्यात महात्मा गांधीजी यांचा एक महिन्याचा सहवास लाभला. रोज गांधींच्या प्रार्थना सभेला ते उपस्थित राहात होते. तेव्हापासून ते खादीची वस्त्र परिधान करत आहेत. गांधीजींच्या समोर चहा पिणार नसल्याची त्यांनी शपथ घेतली, आजपर्यंत कधीही चहाच्या कपाला हात लावला नाही.

स्वातंत्र्यलढ्यात काम करीत असताना त्यांना कधीच पोलिसांची भीती वाटली नाही. कधी तुरुंगात टाकण्याची भीती वाटली नाही. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, पण देश स्वतंत्र होण्याची जिद्द सोडली नाही. तुरुंगात कधीच गावची आठवण झाली नाही. आईवडिलांची काळजी वाटली नाही. त्यांना स्वप्न फक्त देश स्वतंत्र होण्याचेच पडायचे. स्वातंत्र्यानंतर शिक्षकाची नोकरी स्वीकारून ज्ञानदानाबरोबर विद्यार्थ्यांना देश प्रेमाचे धडे दिले. सन १९७१ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबद्दल त्यांना ताम्रपट मिळाले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र मिळाले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अमृतमहोत्सवी वर्ष पाहायला मिळाले, हे माझे नशीब असून, देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली असली, तरी देशाची राजकीय परिस्थिती चांगली नसल्याची खंत व्यक्त केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00869 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..