
काळदरी येथे माजी विद्यार्थी मेळावा
परिंचे, ता. २७ : केदारेश्वर विद्यालय काळदरी (ता. पुरंदर) येथील विद्यालयात १९९६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत रमून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. आपले जुने वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सहसचिव दत्तात्रेय गवळी यांच्या अध्यक्षतेखाली या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयात विद्यादानाचे काम करणाऱ्या सर्व आजी माजी शिक्षक व मुख्याध्यापकांना आमंत्रित केले होते. सर्व गुरुजनांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार म्हणाले, ‘‘या मेळाव्यामुळे आम्हाला एक नवी दिशा मिळाली आहे, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करून दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असल्याचे सांगितले.’’
या वेळी विजय पेटकर, मंदा यादव, संगीता क्षीरसागर, अनिल म्हांगरे, राजेंद्र पिसाळ, भगवान पेटकर, विश्वजित म्हांगरे, नितीन थोपटे, पोपट लोखरे, दादासो लोखरे, संतोष आमराळे, संभाजी धुमाळ, अशोक थोपटे, दीपक चिव्हे, सविता शेलार, वैजयंता शेलार, रवींद्र शेलार, मनीषा शेलार, उषा कारकर, मनीषा जगताप, संगीता कारकर उपस्थित होते. माजी विद्यार्थी घनशाम घोगरे, संगीता क्षीरसागर, विजय पेटकर, मंदा यादव, ज्ञानेश्वर कोंढाळकर, कानिफनाथ आमराळे यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मेळाव्याचे नियोजन प्राचार्य पांडुरंग पाटील यांनी केले होते.