
हरगुडे येथे रंगला खेळ छबिण्यांचा
परिंचे, ता.२ : हरगुडे (ता. पुरंदर) येथील श्री जानाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव वैशाख शुद्ध अष्टमीला म्हणजेच शुक्रवार (ता.२८) उत्साहात साजरा करण्यात आला.
यात्रेसाठी पिंपळे, लपतळवाडी, मांढर, मोर्वे धनकवडी, बांदलवाडी, काळदरी, टोणपेवाडी, पोखर, बापदेववाडी आदी गावांच्या छबिण्यांचा खेळ रंगला. याच वेळी वेदांती व भावार्थ शिळीमकर या बहीण भावाची घोडेस्वारी व तलवारबाजी विशेष लक्षवेधी ठरली.
यात्रेनिमित्त देवीची महापूजा, सवाष्णी, देवीच्या काठीची श्री नरसोबा भेट, विविध गावच्या छबिण्यांचे खेळ, पालखीची ग्राम प्रदक्षिणा,आनंदकुमार भिसे सह पुष्पा उंब्रजकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम, कुस्त्यांचा आखाडा व रंग नवा ढंग नवा हा ऑर्केस्ट्रा असे दोन दिवस अनेक भरगच्च कार्यक्रम पार पडत हा सोहळा संपन्न झाला.
मंदिरात पहाटेपासून महापूजा व अभिषेक सुरू होते. सकाळी देवीची साडी चोळी करण्याचा कार्यक्रम पार पडला दुपारी गावातील महिला भाविकांचा दर्शन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात देवीची काठी माळावर श्री नरसोबाच्या भेटीला नेण्यात आली. मध्यरात्री ढोल ताशा, सनईच्या सुरावटीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्सवमुर्तीची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, शनिवारी (ता. २९) दुपारी लोकनाट्य तर सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा झाला पैलवान रघु जगताप व गणेश चौधरी यांची अखेरची कुस्ती पार पडली. यात्रा कमिटीचे सर्व चौदा सदस्य आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने जानाई देवीचा उत्सवाचे उत्तम आयोजन केले होते.
...
01930