हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त
परिंचे, ता.१८ : परिंचे (ता.पुरंदर) परिसरात दररोज पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके अतिपावसामुळे पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी सुरेश जाधव यांनी केली आहे. तर वर्षभर खायचे काय? असा प्रश्न शेतकरी सुहास जाधव पडला आहे.
पेरणीनंतर परिसरात पिकांना पोषक प्रमाणात पाऊस पडत होता. त्यामुळे परिसरातील पिके जोमदार होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. परिंचे, कांबळवाडी, सटलवाडी, चौधरवाडी, हरगुडे,पांगारे, खेंगरेवाडी परिसरात वारंवार मुसळधार पाऊस पडत आहे. परिंचे येथील भोकरबिंदी, शेरी, आटाळी, गव्हळी, वेतळा बाबा परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणचे क्षेत्र बुधवारी (ता.१७) रात्री झालेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले. भाग बदलत पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सटलवाडी, चौधरवाडी परिसरात कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत कांदा रोपवाटिकांचे पंचनामे करण्याची मागणी सरपंच सागर करवंदे यांनी केली आहे.
संसाराचा गाडा चालवायचा कसा?
सोयाबीन पिकाच्या आर्थिक उत्पन्नावर शेतकरी पुढील पिकांचे नियोजन तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार पैसे साठवतो पण आता हाताशी आलेल्या पिकांवर पाणी फिरल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न पडला असल्याचे शेतकरी संजय जाधव यांनी केला आहे. यावेळी भानुदास वाघोले, रोहिदास जाधव, रवींद्र जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. महसूल विभागाचे परिंचे मंडलचे सर्कल बसवंत बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता, कृषी विभागाच्या मदतीने तलाठ्यांच्या उपस्थित परिसराची पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे.
‘पंचनामे करण्याचे आदेश देणार’
जिल्हाधिकारी यांच्या चर्चा करून पुरंदरचे तहसील यांना नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे करण्याचे आदेश देणार आहे. गुंजवणी योजनेच्या कामाची पाहणी उद्या करण्यासाठी येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.
02772
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.