पौड तहसीलमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पौड तहसीलमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे
पौड तहसीलमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे

पौड तहसीलमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे

sakal_logo
By

पौड, ता. २४ : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या विविध तक्रारींबाबत पौडला तहसील कार्यालयात दर मंगळवारी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांची सुनावणी घेतली जाते. वेळ आणि पैसा खर्च करून शेतकरी पौडला हजेरी लावतात. परंतु, ऐनवेळी सुनावण्या पुढे ढकलल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होते. त्यामुळे पौडला येण्यासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी सुनावण्या रद्द झाल्याच्या सूचना शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आपल्या ताबेवहीवाटीत असलेल्या जमिनींच्या विविध प्रकारच्या न्यायाबाबत शेतकरी तहसील कार्यालयाची दारे ठोठावत असतात. तलाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात मनमानीपणे शेरे मारतात. त्याची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्याचप्रमाणे काही दाव्या प्रतिदाव्यांच्या सुनावणीसाठी शेतकऱ्यांना कार्यालयात यावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या दाव्याच्या सुनावणीसाठी तारखा दिल्या जातात. त्या तारखावेळी शेतकरी स्वतः किंवा वकिलासह पौडला हजर असतात.
तहसील कार्यालयापर्यंत जाण्यासाठी वकिलाच्या शुल्कासह शेतकऱ्यांचा वेळ आणि प्रवासासाठीही खर्च करावा लागतो. धरण भागातून किंवा मोसे खोऱ्यातून आलेल्या ग्रामस्थांचा तर केवळ सुनावणीच्या नावाखाली पूर्ण दिवस जात असतो. तथापि तहसीलदार इतर कामांमुळे पौडला न आल्यास सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. अशावेळी शेतकऱ्यांच्या वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होतो. अगोदरच शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत असते. त्यात नियोजित दिलेल्या तारखांना तहसीलदार नसेल; तर पुन्हा शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याच्या सूचना शेतकऱ्यांना मिळाल्यास पौडपर्यंत पोचण्याची त्यांची फरफट थांबू शकते.
मंगळवारी (त. २१) शेतकरी सुनावणीसाठी पौडला आले होते. परंतु, तहसील कार्यालयासमोर सुनावणी रद्द झाल्याची नोटीस पहावयास मिळाली. नोटीसवर तहसीलदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची सही, शिक्का नव्हता, परंतु अचानक सुनावणी रद्दची नोटीस लागली. त्यामुळे वेळ, पैसा खर्च करून आलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. शेतकऱ्यांची कामं रखडून दुसरीकडे एजंटांचा सुळसुळाट वाढलाय. त्यांच्यामार्फत धनदांडग्यांची कामं होतात, मग आम्हाला असे हेलपाटे का मरायला लावतात? असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडलाय.

शेतकऱ्यांची रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले होतं. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांच्या समक्ष तहसीलदार अभय चव्हाण यांना कार्यपद्धत सुधारण्यासाठी बजावलं होतं. तरीदेखील त्यात सुधारणा होत नाही.
- अंकुश जगताप, अध्यक्ष, मुळशी ग्रामविकास संस्था

जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाच्या कामासाठी गेल्यामुळे मंगळवारची सुनावणी रद्द करून ती पुढे ढकलण्यात आली. नोटीस तहसील कार्यालयासमोर लावल्यामुळे त्यावर सही अगर शिक्क्याची गरज नाही.
- अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b00971 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top