मुळशीतील आरक्षण सोडत पुन्हा काढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील आरक्षण सोडत पुन्हा काढणार
मुळशीतील आरक्षण सोडत पुन्हा काढणार

मुळशीतील आरक्षण सोडत पुन्हा काढणार

sakal_logo
By

पौड, ता. २८ : मुळशी तालुक्यातील पंचायत समितीच्या भूगाव गणाच्या जागेचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याने तालुक्यातील आरक्षण सोडत पुन्हा जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे गुरूवारच्या (२८ जुलै) आरक्षण सोडतीत उत्साहाचे उधाण आलेल्यांची पुन्हा धाकधूक वाढली आहे.
पौडला पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात तहसीलदार अभय चव्हाण यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. यावेळी जिल्हा पुरवठा निरीक्षक सुरेखा माने, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, सरीता पाटील, गटविकास अधिकारी संदीप जठार आदी उपस्थित होते.
बावधन बुद्रुक, सूस ही मोठी महापालिकेत जाऊनही यावेळी तालुक्यात पंचायत समितीसाठी सहाऐवजी आठ गण तयार झाले आहेत. त्यामुळे गणांची नावेही बदलली असून, काही गावांचे गणही बदलले गेले आहेत. सर्वाधिक लोकसंख्येचे पिरंगुट हे गाव दोन गणात विभागले आहे. सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला जागेची आरक्षण सोडत जाहीर केली. हिंजवडी गणात सर्वाधिक २६२५ अनुसूचित जातीचे मतदार आहेत. त्या खालोखाल भूगावला २२८६ आणि माणला २१८२ मतदार आहेत. वास्तविक आयोगाच्या सूचनेनुसार गणाच्या रचनेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त बदल झाल्यास त्याठिकाणी नव्याने आरक्षण टाकले जावे, पण बदलत्या गणरचनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी बदल झाला असल्यास सन २००२ ते २०१७ पर्यंतच्या निवडणुकीतील आरक्षणाचाही विचार केला गेला पाहिजे. भूगाव या नव्याने झालेल्या गणातून बावधन हे गाव वगळले गेले. परंतु, भूगावची फेररचना करताना त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी बदल झाला आहे. यापूर्वी हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे या गणात पुन्हा तेच आरक्षण पडू शकणार नाही. उपस्थित लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी ही बाब महसूल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आयोगाला याबाबत कळविले. आयोगानेही ही बाब मान्य केली असून, येथे फेरआरक्षण करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. आयोगाकडून तारीख कळविल्यानंतर फेरआरक्षण जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षण सोडतीत माले आणि कासारआंबोली हे दोन गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, कोळवण, कासारसाई, हिंजवडी, माण हे चार गण सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले आहेत. आयटीनगरीतील सर्वच गण खुले झाल्याने याठिकाणी विविध पक्षांतील अनेक युवा इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि पुन्हा होणाऱ्या आरक्षण सोडतीत भूगाव गणामध्येच बदल होणार की इतर गणांनाही धक्का बसणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pud22b01018 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..