मुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार - सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mulashi
मुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार

मुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार - सुप्रिया सुळे

पौड : ‘‘मुळशी तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. त्यासाठी तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. पर्यटकांच्या वाढीसाठी धरण भागातील दोन गावांत वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी केली जाईल,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

खासदार सुळे यांनी पौड येथील ‘पत्रकार भवन’ला भेट देत तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र हगवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या व खासगी देवराईंचे जतन करण्याबाबतच्या उपाययोजना, भरे येथील क्रीडा संकुलात क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक करण्याची गरज, आयटीनगरी असलेल्या हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि कचऱ्याची समस्या, तालुक्यात डोंगराचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्यामुळे पर्यावरणाला बाधा येत असले प्रश्‍न, भूगाव व भुकूममधील कचरा समस्या, पौडला शेतकरी भवन उभारण्याची गरज, चांदणी चौकातून मुळशीकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले कामाची दुरवस्था, पौडच्या वाहतूक कोंडीची व्यथा, कोळवण रस्त्याची दुरवस्था, धामण ओव्हाळमार्गे पर्यायी मार्ग, मुळशीत पिकणाऱ्या इंद्रायणी तांदळाला हमीभाव, रामनदीचे जलशुद्धीकरण, मोडकळीस आलेली पोलिस वसाहत नव्याने उभी रहावी, आदी विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल नीलेश शेंडे, धोंडीबा कुंभार, संजय दुधाणे, बबन मिंडे, शंकर टेमघरे, तेजस जोगावडे यांना गौरविण्यात आले. रमेश ससार यांनी सूत्रसंचालन केले. बंडू दातीर यांनी आभार मानले. कोंढरे यांनीही पक्षाच्यावतीने सर्व पत्रकारांना सन्मानित केले. राजेंद्र मारणे, कालिदास नगरे, सागर शितोळे, महादेव पवार, दत्तात्रेय उभे, रामदास दातार, साहेबराव भेगडे, प्रवीण सातव, गोरख माझिरे, गणेश अभिमाने, रामदास मानकर, प्रतीक्षा ननावरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

गडकरी यांच्याशी चर्चा करणार
मुळशीतील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित समस्यांबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नांसंदर्भात २९ ऑगस्टला चर्चा केली जाणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. तसेच, पौडला महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय होण्याची मागणी त्यांनी जागेवरच आदेश देऊन पूर्ण केली.