मतदार मुळशीत; केंद्र नगरला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार मुळशीत; केंद्र नगरला!
मतदार मुळशीत; केंद्र नगरला!

मतदार मुळशीत; केंद्र नगरला!

sakal_logo
By

पौड, ता. १६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्य निवडीच्या पदवीधरच्या मतदानासाठी मुळशी तालुक्यात एकही केंद्र न ठेवता पुण्याच्या आसपासच्या केंद्रात नावे समाविष्ट केली गेली आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील काही मतदारांना मतदानासाठी नगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, पाथर्डी हे केंद्र दिली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या अजब गैरसोयीच्या केंद्रांमुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
रविवारी (२० नोव्हेंबर) ही निवडणूक होणार आहे. तथापि मुळशी तालुक्यात एकही मतदान केंद्र दिले नाही. काही मतदारांची नावे पुणे विद्यापीठातील केंद्रात समाविष्ट केली आहेत. तर, काहींची नावे पुण्याच्या आसपासच्या विविध मतदान केंद्रात विखरून टाकली गेली आहेत. मात्र, भूगावच्या पूजाराम गांगुर्डे यांना मतदानासाठी प्रवरा महाविद्यालय राहुरी (जि. नगर) येथे जावे लागणार आहे. तर, काहींची नावे शेवगाव, पाथर्डी या नगर जिल्ह्यातील मतदान केंद्रात समाविष्ट केली आहेत. घरापासून शेकडो किलोमीटर दूर हे अंतर आहे. त्यामुळे इच्छा असूनही या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य होणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या या अजब गैरसोयीच्या मतदान केंद्राबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे जनतेत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आयोग विविध उपक्रम राबवीत असते. मात्र, सिनेट निवडणुकीत शेकडो किलोमीटर दूर अंतरावरील मतदान केंद्र दिल्याने त्यावर जनमानसात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मी पौडमधील रहिवासी आहे. मात्र, माझे नाव नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील केंद्रात समाविष्ट केले आहे. मी खासगी कंपनीत नोकरीला आहे. मतदानासाठी तास-दोन तासाचा वेळ मी काढू शकतो. परंतु, पौडमधून शेवगावला जाण्यायेण्यात माझा पूर्ण दिवस जाईन. त्यामुळे मला मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. याला जबाबदार कोण?
- आशिष काकडे, पौड (ता. मुळशी)

ग्रामीण भागात महाविकासआघाडीचे जबरदस्त वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचे उमेदवार विजय होणार, हे निश्चित आहे. तथापि पाताळयंत्री विरोधक मतदान केंद्र लांबवर टाकून ग्रामीण भागातील पदवीधरांना मतदानापासून वंचित ठेवू पाहत आहेत. हे त्यांचे कृत्य जाणीवपूर्वक असले; तरी आमच्या उमेदवाराच्या विजयावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
- महादेव कोंढरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मुळशी